सांडपाण्याच्या मिश्रणातून नागरिकांना करावी लागते पायधुणी!
औराद शहाजानी (Social Issues) : चौफेर विकासाच्या गप्पा करणाऱ्या ‘लाडक्या बहिणी’च्या औराद गावात गल्लोगल्लीतील रस्ते पाण्याने तुडूंब भरले आहेत. औरादच्या विकासाचे (Development) गोडवे एकीकडे गात असताना दुसरीकडे गावातील प्रभाग 2 मधल्या सिंदी गल्लीमध्ये पावसाचे पाणी तुडुंब भरले असून, या पाण्यात सांड पाण्याचे मिश्रण झाल्याने नागरिकांना आपली पायधुणी करीत त्यातूनच प्रवास करावा लागत आहे.
औरादकरांमध्ये संतापाची लाट, या दुरवस्थेला जबाबदार कोण?
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील प्रभाग 2 मधील सिंदी गल्ली भागात पावसाचे व सांडपाण्याचे योग्य निचऱ्याची व्यवस्थाच नाही. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर पाणी साचून राहिले आहे. परिणामी, या रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना (Citizens) व वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सिंदी गल्लीतील रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. याच पाण्यात सांडपाणी (Waste Water) मिसळले गेल्याने परिसरात दुर्गंधी व डासांचे प्रमाणही वाढले आहे. हे पाणी नाल्यात न जाता रस्त्यावरच साचत असल्याने औरादकरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मात्र या गंभीर समस्ये कडे ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांना लक्ष देण्यास थोडीही फुरसत मिळत नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे गाव विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे औरादवाशियांना दुर्गंधीच्या (Stench) पाण्यातून आपले नाक तोंड दाबून प्रवास करावा लागत आहे. या दुरवस्थेला जबाबदार कोण? असा सवाल केला जात आहे.
अजून पावसाळा पुढेच…
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी स्थिती निर्माण झाली असताना, पुढील काळात पावसाचा जोर वाढल्यास या भागातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने याबाबत तातडीने कारवाई करून नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी अपेक्षा आहे.
नालीला उतारच नाही : ग्रामसेवक
या दुरवस्थेबाबत औरादचे ग्रामविकास अधिकारी एस. एच. गिरी यांच्याशी संपर्क साधला असता, नालीला योग्य उतार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे यापूर्वी तयार करण्यात आलेली नाली उतारा विना तयार केली होती, असा स्पष्ट अर्थ होतो. तूर्तास नालीला योग्य उतार नसल्यामुळे नाली तात्पुरत्या स्वरूपात काढण्यात येणार आहे, असेही गिरी म्हणाले. बजेट आल्यानंतर कायमस्वरूपी नाली केली जाईल, असेही गिरी यांनी सांगितले.