औशात टोकणसाठी लागतेय पहाटे अडीचपासून रांग!
औसा (State Bank of India) : पहाटे दोन वाजता उठून कुणी बँकेकडे जाईल का… आणि गेल्यानंतर बँक तरी सेवा देईल का..? असा प्रश्न आपणाला पडणे साहजिक आहे. मात्र हे अर्धसत्य आहे. पहाटे दोन वाजता उठून आता औसा तालुक्यातील अनेक गावांमधून लोक औसाकडे निघत आहेत. अडीच, तीन, साडेतीन, चार, पाच वाजेपर्यंत औशातील (State Bank of India) भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमोर हे लोक येतात आणि रांगेत थांबतात. बँक मात्र नेहमीप्रमाणे साडेदहाला उघडते आणि त्यानंतर ग्राहकांना सेवा मिळू लागते. सध्या एसबीआयच्या शाखेत केवायसी करून घ्यायची असेल तर ती अशा पद्धतीने करून घ्यावी लागते… अन् ही केवायसी मग तब्बल 13 तासांनी फत्ते होते.
केवायसी करून आपले बँक खाते अद्यावत ठेवण्याचा आदेश (State Bank of India) भारतीय स्टेट बँकेने काढला असून आपले खाते केवायसी करून घेण्यासाठी औसा येथे ग्राहकांना पहाटे अडीच वाजल्यापासून पाऊस-थंडीची तमा न बाळगता कुडकुडत बँकेच्या समोर रांगा लावण्याची वेळ आली आहे. ग्राहकांना होणाऱ्या या जाचाचे भारतीय स्टेट बँकेच्या वरिष्ठ कार्यालयांना काहीही देणे-घेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान बँकेचे या भूमिकेबद्दल ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
परवा काढलेल्या केवायसीच्या आदेशानंतर ग्राहक बँकेकडे खेटे घालत आहेत. चार-चार दिवस बँकेत येऊनही केवायसीसाठी नंबर लागत नसल्याने तालुक्याच्या विविध गावांतून अनेक ग्राहक मध्यरात्रीनंतर बँकेकडे येत आहेत. पहाटे दोन ते अडीचपासून या बँकेसमोर केवायसीसाठी ग्राहकांची रांग लागत आहे. बँक उघडल्यानंतर सकाळी साडेदहा वाजता बँकेचा एक कर्मचारी या रांगेतील कर्मचाऱ्यांना टोकणचे वाटप करतो. त्यानंतर तेवढ्याच टोकणधारकांना त्या दिवसापूर्वी केवायसीची सेवा मिळते.
आलमला येथील राजश्री महिशंकर बिराजदार यांचे केवायसीसाठी चार दिवसांपासून (State Bank of India) बँकेकडे खेटे होते, मात्र नंबर काही लागेना. अखेर शुक्रवारी झाले असे… राजश्री यांचे पती महिशंकर बिराजदार हे पहाटे अडीच वाजताच आलमला येथून औशाला बँकेकडे गेले. तरीही त्या ठिकाणी आठ जणांची रांग लागली होती, यात महिलाही होत्या. यावेळी औसा पोलीस ठाण्याची गस्त पथकाची गाडी तेथे आली. संबंधित पोलिसांनी थांबलेल्यांची चौकशीही केली. त्यावेळी केवायसीसाठी थांबलोत, असे सांगितल्यानंतर सकाळी येता येत नाही का? असे पोलीस म्हणाले. मात्र सकाळी येऊन केवायसीसाठी नंबर लागेना, असे सांगितल्यानंतर पोलीस निघून गेले. सकाळी साडेदहाला बँक उघडल्यानंतर एका कर्मचाऱ्यांनी रांगेतील लोकांना टोकन दिले आणि अखेर दुपारी साडेतीनच्या सुमारास राजश्री महेश शंकर बिराजदार यांच्या खात्याच्या केवायसीचे काम फत्ते झाले.
काय करतात औशाचे नेते?
एकंदरीत या प्रकारामुळे (State Bank of India) एसबीआयकडून औसा तालुक्यातील लाखावर ग्राहकांची हेळसांड होत आहे. ही हेळसांड होत असताना औसा तालुक्यातील एकाही लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षाच्या नेत्याला याबाबत आवाज उठवावा, असे वाटले नाही औसेकरांचे दुर्दैवच आहे.
वरिष्ठांनी लक्ष दिल्यास प्रश्न सुटेल : व्यवस्थापक
स्टेट बँक ऑफ इंडियाला केवायसी (SBI KYC) करून आपले खाते अद्यावत ठेवणे आवश्यक असल्याने शाखेवर ताण पडतो. जर वरिष्ठांनी लक्ष दिल्यास शाखेला कर्मचारी संख्या वाढविल्यास लाईन लावून थांबण्याची गरज पडणार नाही, असे बँक व्यवस्थापक निलेश गादेवाड व निलेश तांबे यांनी सांगितले.
चार दिवसांपासून केवायसीसाठी नंबर लागत नव्हता. म्हणून शुक्रवारी पहाटे अडीच वाजता आलमला येथून औशाला गेलो, तरीही बँकेपुढे रांगेत आठ जण थांबले होते, त्यात महिलाही होत्या. याचवेळी औसा पोलीस ठाण्याची पेट्रोलिंग गाडी आली त्यांनीही आमची का थांबलात? म्हणून चौकशी केली. सकाळी त्यावेळी केवायसी साठी थांबलो आहोत असे सांगितल्यानंतर पोलीस निघून गेले. सकाळी बँक उघडल्यावर टोकण मिळाले अन् दुपारी साडेतीनला केवायसीचे काम पूर्ण झाले.
– राजश्री व महिशंकर बिराजदार, आलमला




 
			
