Babhulgaon :- तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैधरित्या देशीदारू(country liquor), हातभट्टी दारू मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे. नांदुरा बु. येथे ४, पालोती येथे ४, प्रतापपूर येथे ३ या प्रमाणे अवैधरित्या दारू विक्री करणारे दुकानदार त्यांच्या घरीच हातभट्टी व देशी दारू विक्री करीत आहेत. या बाबत येथिल महिलांनी १२ जुलै रोजी ठाणेदार, पोलीस स्टेशन बाभूळगाव यांना निवेदन दिले होते. परंतु त्यांनी काहीच कारवाई न केल्याने येथील महिलांनी १५ जुलै रोजी पोलीस अधिक्षक यांची भेट घेवून निवेदन दिले. याउपरही काही कारवाई न झाल्यास येत्या १८ जुलै रोजी नांदुरा बु.(पुलाचे) येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनातून देण्यात आला.
महिलांनी दिले पोलीस अधिक्षकांना निवेदन
या गावातील सदर दारू विक्रेते मुजोर झाले असून ते महिलांशी हुज्जत घालत आहेत. दारूच्या आहारी जावून गावातील तरूण व्यसनाधीन झाले असून घर-संसार उध्वस्त होत आहेत. याबाबत येथील पोलीस प्रशासनाला वारंवार सुचना दिल्या पंरतु त्यांनी जाणिवपुर्वक या प्रकारांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे येथील पोलीस व अवैध दारू विक्रेत यांचे काहीतरी आर्थिक संबंध असावे. असा आरोप महिलांनी निवेदनातून केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक्षक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नांदुरा बु., पालोती, प्रतापपूर येथील अवैध देशी दारू, हातभट्टी दारू विक्री बंद करून दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदनावर लक्ष्मी लाडे, लक्ष्मी देवकर, रेणुका पवार, सुमित्रा शेळके, आशा पवार, नंदा शेळके, बाली पवार, इंद्रकला गुबरे, पार्वताबाई देवकर, शिवानी शेळके, कांता पवार, पंचफुला मुदळकर, विठाबाई देवकर, अर्चना धोत्रे, योगिता शिंगाडे, अर्चना मिटकर, पंचफुला दांडेकर, मिना शेळके आदिंसह असंख्य महिलांच्या सह्या आहेत.