हिंगोली (Teacher Transfer) : शहरातील अंतुलेनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका मीरा कदम यांची झालेली बदली रद्द करण्यासाठी २३ सप्टेंबर मंगळवार रोजी जिल्हा परिषदेत मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या दालना समोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत पालकासह शिक्षणाधिकारी यांना बदली रद्द करण्यासाठी निवेदन दिले.
हिंगोली शहरातील अंतुलेनगर भागातील जिल्हा परिषद शाळेतील (Teacher Transfer) शिक्षिका मीरा कदम – गणगे यांची बदली प्राथमिक शाळा फाळेगाव या ठिकाणी झाली आहे. पण या बदलीमुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतुलेनगर या शाळेतील विद्यार्थी अस्वस्थ झाले आहेत. इयत्ता पाचवीतील अनेक विद्यार्थी टीचर येईपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाही असे पालकांना सांगत आहेत. यामुळे पालकांतून नाराजी आहे. ज्या दिवशी शिक्षिकेची बदली झाली त्यादिवशी विद्यार्थी रडत होते. ताई तुम्ही जाऊ नयेत म्हणून त्यांनी शाळेचे गेट बंद केले होते.
मीरा कदम यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्पर्धा परीक्षेचे वातावरण तयार केले होते. विविध उपक्रम घेऊन त्या शाळेचा विकास करत होत्या. त्यांच्या विविध उपक्रमामुळे शाळेची पटसंख्या वाढण्यास मदत झाली आहे. या शाळेतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुढे येत आहेत.
एकीकडे जिल्हा परिषद शाळेमध्ये पटसंख्या कमी होत असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतुलेनगर येथे मात्र 400 च्या जवळपास विद्यार्थी आहेत. आणि यामध्ये मीरा कदम यांचा सिंहाचा वाटा आहे.इयत्ता पहिली मध्ये 18 विद्यार्थीसंख्या घेऊन सुरू केलेल्या वर्गात इयत्ता पाचवी मध्ये 71 मुले आहेत. आणि या सर्व मुलांना त्या एकट्याच शिकवायच्या.
नवोदय स्कॉलरशिपसाठी 29 मुले इयत्ता पाचवीची बसलेली आहेत. त्यांच्या (Teacher Transfer) बदलीमुळे या सर्व मुलांचे नुकसान होते की काय अशी भावना पालकांमध्ये निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतुले नगर येथील विद्यार्थी शेतकरी शेतमजुराचे आहेत.. त्यांना आईप्रमाणे लळा लावत होत्या. त्यांचे आजारपण आणि इतर अनेक गोष्टीत त्या मुलांवर आईप्रमाणे लक्ष देत होत्या. त्यांची बदली होणं ही गोष्ट पालक स्वीकारू शकत नाहीत.. त्यामुळेच विद्यार्थ्यांसह पालकांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांना निवेदन देऊन मीरा गणगे यांची बदली रद्द करावी असे निवेदन दिले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधव भवर, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य मनोज लिंबेकर, प्रिया मुळीक, अलका कांबळे ,दिगंबर फंदे संजय काळे, शिवाजी कऱ्हाळे, विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी उपस्थित होते.