बेरोजगारांच्या भवितव्याशी खेळ: ‘भरती रजिस्ट्रेशन कॅम्प’चे ‘ते’ पत्र बनावटच!
जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण
जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण
लातूर (Latur Collector) : बेरोजगारांच्या असाहाय्यतेचा व अगतिकतेचा गैरफायदा घेत काही खाजगी कंपन्यांनी लातूर जिल्ह्यातही धुमाकूळ घालत तरुणांना गंडविण्याचे काम चालविले आहे. यासाठी दस्तूरखुद्द लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरफायदा उचलत जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांनाही (Latur Collector) जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे बोगस पत्र माध्यमांमध्ये फिरविले आहे. दरम्यान याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने स्पष्टीकरण देत या कंपनीच्या भरती रजिस्ट्रेशन कॅम्पस जिल्हाधिकारी कार्यालयाचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
एसआयएस इंडिया लिमिटेड या कंपनीत रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन शुल्क घेतले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फिरविण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले होते.
हे पत्र (Latur Collector) लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीने व क्रमांक दंड/05/कावि/4088173/2025, दिनांक 28/05/2025 अन्वये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांना निर्गमित करण्यात आल्याचे भासवण्यात आले होते. बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एसआयएस इंडिया लिमिटेड या नावाच्या खासगी कंपनीमार्फत क्षेत्रीय स्तरावर भरती रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्यात येत असल्याबाबतचे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाकडे अनेकांनी खातरजमा करण्यासाठी चौकशी चालविल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरफायदा घेतला गेला असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, (Latur Collector) जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हे पत्र निर्गमित झाल्याचे भासविण्यात आले असून हे पत्र बनावट आहे. भरती रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्याबाबत लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोणतेही पत्र निर्गमित करण्यात आलेले नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले आहे.
या पत्रात सुशिक्षित बेरोजगारांना सुरक्षा क्षेत्रातील प्रशिक्षण मिळून त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळवा, यासाठी एका खासगी कंपनीद्वारे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भरती रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. या माध्यमातून नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन शुल्क घेतले जाणार असल्याचे नमूद करण्यात आले होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीवर कारवाई करावी!
जिल्हाधिकाऱ्यांच्या (Latur Collector) डिजिटल स्वाक्षरी वापर करून जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र असल्याचे भासवण्याचा हा प्रकार केवळ खुलासे किंवा स्पष्टीकरण देण्यापुरता नाहीच. लातूरच्या जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्ह्यातील तमाम बेरोजगारांच्या जीवनाशी खेळणाऱ्या अशा कंपन्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. नोकर भरतीबाबत सोशल माध्यमातून बेरोजगारांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या अनेक कंपन्या असून सर्रास शासनाच्या विविध विभागांची नावे घेत या कंपन्या बेरोजगारांना लुटत आहेत. अशा कंपनीवर कारवाईची गरज आहे.
फसवणुकीच्या प्रकारापासून सतर्क रहा…
हे पत्र लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या (Latur Collector) डिजिटल स्वाक्षरीने व क्रमांक दंड/05/कावि/4088173/2025, दिनांक 28/05/2025 अन्वये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांना निर्गमित करण्यात आल्याचे भासवण्यात आले होते. मात्र, अशा प्रकारे कोणतेही पत्र लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निर्गमित करण्यात आलेले नाही, स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अशा बनावट व फसवणुकीच्या प्रकारापासून सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.