गंगाखेड तालुक्यात घडली होती घटना, शोधकामी चार पथकांची स्थापना..!
परभणी/गंगाखेड (Parbhani Dead Body) : शहरातील रेल्वे स्थानक परिसरातुन वाहणाऱ्या नाल्यात मंगळवार २८ जानेवारी रोजी सकाळी आढळून आलेल्या अनोळखी इसमाच्या मृतदेहाची ओळख पटली नसल्याने याचा शोध घेण्यासाठी गंगाखेड पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांचे एकूण चार पथक तयार करण्यात आले असुन याबाबत काही माहिती असल्यास पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड रेल्वे स्थानक परिसरातील बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या नवीन रेल्वे कॉर्टर परिसरातुन वाहणाऱ्या नाल्यात मंगळवार २८ जानेवारी रोजी एका अनोळखी इसमाचा (Parbhani Dead Body) निर्वस्त्र मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याची माहिती समजताच गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गित्ते, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे, पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर आदींनी घटनास्थळी धाव घेत नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने नाल्यातील निर्वस्त्र मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला.
निर्वस्त्र सापडलेला मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. केशव मुंडे यांना घटनास्थळी पाचारण करून जागेवरच शवविच्छेदन करून नगर परीषद कर्मचाऱ्यांच्या मदतीने गोदावरी नदी काठावर असलेल्या न. प.च्या जागेत दफनविधी केला. घटनेची माहिती समजताच प्रो. पोलीस अधिक्षक ऋषिकेश शिंदे, पूर्णा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील, रेल्वेचे परभणी येथील पोलीस निरीक्षक आर. बी. कांबळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अनोळखी इसमाचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह (Parbhani Dead Body) मिळून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही त्याची ओळख पटली नव्हती.
शोधकामी चार पथकांची स्थापना
अनोळखी इसमाच्या मृतदेहाची (Parbhani Dead Body) दुसऱ्या दिवशी ही ओळख पटली नसल्याने याचा शोध घेण्याकामी गंगाखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड पोलीस ठाण्याचे तीन व स्थागुशाचे एक असे एकूण चार पथक स्थापन करण्यात आले आहे. यात गंगाखेड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युसूफ खान पठाण, जमादार गौस खान पठाण, गणेश चनखोरे, पो. शि. परसराम परचेवाड, रविंद्र कुमरे, राहुल राठोड, गोविंद कदम, धनंजय कनके, चंद्रप्रकाश कांबळे यांच्यासह स्थागुशाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कांगणे, पो. शि. परसराम गायकवाड यांचा समावेश आहे.
शोधपत्रिका जाहीर
गंगाखेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका नाल्यामध्ये अनोळखी अंदाजे ३० ते ३२ वर्ष वयाचा इसम मृतावस्थेत मिळून आल्याची शोध पत्रिका गंगाखेड पोलीस ठाण्याच्या वतीने जाहीर करण्यात आली असुन त्यात खालील माहिती नमूद करत अनोळखी इसमाच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात (Parbhani Dead Body) मयताचे उजव्या हाताचे मनगट व डाव्या पायात काळा दोरा बांधलेला असून उजव्या छातीवर नप्पा, डाव्या छातीवर भैय्या असे गोंदलेले आहे. गळ्यात दोऱ्यामध्ये गुलाबी रंगाचे तावीज बांधलेले आहे.
डोक्यावरील केस लांब असून दाढी राखलेली आहे. मयताचे उजव्या हातावर D S व N.S. असे इंग्रजी अक्षरात गोंदलेले असल्याचे नमूद करून वरील इसमा बाबत काही तक्रार किंवा अधिक माहिती असल्यास किंवा माहिती प्राप्त झाल्यास गंगाखेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर यांनी केले आहे.