Chandrapur :- दीड ते दोन महिन्याच्या प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर सोमवार २३ जून २०२५ पासून २०२५-२६ शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. याच अनुषंगाने जिल्हा परिषदसह सर्व शाळा सुरु होणार असून शाळेच्या पहिल्या घंटेचा घनघनाट आणि विद्यार्थ्याची किलबिल यामुळे शाळेचा संपूर्ण परिसर पुन्हा एकदा गजबजणार आहे. यासह नविन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद (Zilla Parishad) विभाग प्रमुख व शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी तसेच राज्य शासनाच्या इतर विभागातील वर्ग २ व त्यावरील २१९ अधिकारी हे जिल्हा परिषद शाळांना भेटी देणार आहे. त्याबाबतचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे.
२१९ अधिकारी हे जिल्हा परिषद शाळांना भेटी देणार
शााळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह असून नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. २१ व २२ जून रोजी सर्व शाळांमध्ये शालेय परिसर स्वच्छता व शाळा सजावट करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाकडून दिले गेले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकितसिंग हे कोरपना येथील आदिवासी बहूल असलेल्या जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन तेथील विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी संवाद साधणार आहे. तसेच शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तक दिनाचे आयोजन करण्यात आले असून शाळा व्यवस्थापन समितीच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण जिल्ह्यातील शाळांमध्ये करण्यात येणार आहे.
एकंदरीतच शाळेच्या पहिल्या दिवशी ज्या उत्साहाने विद्यार्थी आपली उपस्थिती दर्शवितो तो उत्साह शेवटपर्यंत टिकून राहावा यासाठी यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच विविध उपक्रमात त्यांचा सहभाग राहावा यासाठीही शाळा प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे