स्थानिक प्रशासनासह आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
मृतांच्या नातेवाईकांची गैरसोय
लाखनी (Lakhani Mortuary) : लाखनी-सालेभाटा मार्गावर असलेल्या तालुक्यातील एकमेव शवविच्छेदनगृह भग्नावस्थानेत असून घाणीच्या साम्राज्यात अखेरची घटका मोजत आहे. सुविधांचा अभाव असल्याने मृतकांच्या नातेवाईकांची प्रचंड गैरसोय होत आहे. परिणामी, नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याकडे मात्र, स्थानिक प्रशासनासह आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांत तीव्र संतापजन्य भावना उमटत आहेत.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या (Lakhani Mortuary) लाखनी येथील सालेभाटा मार्गावर अनेक वर्षांपूर्वी शवविच्छेदन गृह तयार करण्यात आले. तेव्हापासून त्याचठिकाणी लाखनी तालुक्यात घडलेल्या आत्महत्या, अपघाती िंकवा इतर कारणांमुळे मृत पावलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन लाखनी ग्रामीण रुग्णालय अंतर्गत केला जात आहे. मात्र, याठिकाणी सोयीसुविधांचा अभाव दिसून येत आहे. पाणी, वीज, शितपेटी व इतर सुविधा उपलब्ध नसल्याने नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यासोबतच शवविच्छेदन (Lakhani Mortuary) करणारा कर्मचारी निवासी नसल्याची बाब पुढे येत आहे. भग्नावस्थेत व अखेरची घरघर लागलेल्या शवविच्छेदनगृहात मृतदेहाची विल्हेवाट लावली जात आहे. याकडे मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच स्थानिक नगरपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष असल्याने लाखनी येथील शवविच्छेदनगृह भग्नावस्थेत असून अखेरची घटका मोजत आहे. यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.