राजेंद्र काळे
बुलढाणा: (Shabdakhatar Concert)
“कुठे बिनसले जर मला भेटून जाताना,
लगोलग हात धर मला भेटून जाताना..
असू दे तुला केवढी घाई चुकू दे ट्रेन एखादी,
जरा रेंगाळ ओठांवर मला भेटून जाताना!”
मुंबईतल्या धावपळीत होणारं प्रेम म्हणजे लोकलच्या टाईमवर चालणारं. एखादी ट्रेन चुकलीतरी चालेल पण रेंगाळ ओठांवर मला भेटून जातांना, किती ही अफलातून कल्पना, ती काव्यात गुंफली यामिनी दळवी यांनी.. की ज्या एबीपी माझाच्या न्यूज अँकर आहेत, अन् बुलढाणेकर रसिकही त्याला कमालीची दाद देवून गेले. निमित्त होतं, ‘शब्दाखातर’ या गझल, काव्य अन् गप्पांच्या अनोख्या मैफीलीचं. ही मैफील गोवर्धन सभागृहाच्या मंचावर रंगली ती, शुक्रवार १८ जुलैच्या सायंकाळी!‘तिचा तो खास झाल्यावर मनाला त्रास झाल्यावर,
करावे बंद आठवणे तिचा तो भास झाल्यावर..
बियाण्यासारखा मृत्यू मलाही दे जरा देवा,
किती आनंद होतो रे कुणाचा घास झाल्यावर!’
नाशिकच्या आकाश कंकाळ याच्या या ओळी, टाळ्यांनी सभागृह दणाणून गेल्या. तर बुलढाण्याचा विशाल मोहिते गझलेतून सर्वांना मोहित करुन गेला.‘हिरवे भगवे निळे नि काळे समजून घेऊ,
या दुनियेचे सारे चाळे समजून घेऊ..
कधी आहे ते दाणे जर का समोर आले,
त्यांच्याखाली असेल जाळी समजून घेऊ!’
यासह ‘हा देश माझा शांतीची मिसाल होता,
पण अधे-मधे इथेही नार्यांनी बडबड केली..
वणव्याच्या खटल्यावरती हा न्याय निवाडा झाला,
निर्दोष निघाल्या ठिणग्या वार्याने गडबड केली!’
या व अशा अनेक गझला विशालने सादर केल्या. त्यात
“मी आईला सगळे दुखणे सांगत बसतो,
आई मजला कधीच काही सांगत नाही..” यासह
“एक एक करता करता, त्या जमून साऱ्या आल्या..
तुझ्या स्मृती का आज, अचानक बनून खाऱ्या आल्या..
कधी कुणाला स्वतःच्या घरात दिसला विठ्ठल,
अन् कोणाच्या नशिबामध्ये नुसत्या वाऱ्या आल्या!”
अशा गझलांचा समावेश होता. तर आकाश कंकाळची गाजली ही गझल..
“विठ्ठला रे कुणी भीक मागू नये,
एक वरदान दे भुक लागू नये..
झोपतो देह हा अर्धपोटी जरी,
वाटते पण भिती पोट जागू नये !” तर यामिनी दळवीची ही गझल-
ऋतूंना गायला सांगू, तिलाही यायला सांगू..
सुखांना आज माहेरी पुन्हा परतायला सांगू!
सर्वात गाजली ती यामिनी दळवी यांची ही कविता..
“तुम्ही शिकवू नका मला
सावरकरांची देशभक्ती खरी,
की आंबेडकरांची की गांधींची?
मला ठाऊक आहे,
तुमच्या द्रोणाचारी वृत्तीमागे असणारी
तुमची छूपी कट्टरता!’
मैफीलीचे आयोजक होते स्व. जयराम गायकवाड फाऊंडेशन, मृण्यमी मल्टीपर्पज सोसायटी, रविकिरण छायाचित्रण व कारगील एक्स सर्व्हीसमेन कॉर्पोरेशन. पाहुण्यांचा परिचय करुन दिला डॉ.वैशाली निकम व क्षितीज निकम या माय-लेकाने, सूत्रसंचालन रविकिरण टाकळकर यांनी तर कर्नल सुहास जतकर यांनी आभार मानले. डॉ.गणेश गायकवाडांनी सुध्दा गझल व मराठी कविता सादर केली. डॉ. गजेंद्र निकम, पियुष टाकळकर यांची आयोजनात महत्त्वाची भूमिका होती. यावेळी बुलढाण्याच्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांची व साहित्यप्रेमींची प्रामुख्याने उपस्थित होती.
“कशी पसरते इतकी लाली संध्याकाळी,
सूर्य कदाचित हसतो गाली संध्याकाळी..
कंटाळा या जगण्याचाही आल्यानंतर,
जीव करावा तुझ्या हवाली संध्याकाळी !”
या गझलेने मैफीलीची सायंकाळ मालवली, शब्दाखातर!!