नगर पालिका निवडणुकीची सर्वत्र धामधुम
आक्षेप दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस
आक्षेप दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस
हिंगोली (Hingoli Election) : जिल्ह्यातील हिंगोली व वसमत नगर पालिका क्षेत्रात मतदार याद्यांमध्ये मोठी गडबड झाल्याच्या तक्रारी येत आहेत. यावर आक्षेप दाखल करण्यासाठी १३ ऑक्टोंबर सोमवार हा शेवटचा दिवस आहे.
तीन नगर पालिका असलेल्या (Hingoli Election) हिंगोली जिल्ह्यात हिंगोली व वसमत या दोन नगर पालिका क्षेत्रातंर्गत मतदार याद्यामध्ये मोठी गडबड झाल्याच्या तक्रारी सुरूच आहेत. हिंगोली शहरातील काही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनोळखी मतदारांची नावे सामील झाल्याची तक्रार प्रभाग क्र.१५ मधील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली आहे. यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मात्र हजर नव्हते. शिवाय एका प्रभागातील अनेक मतदारांची नावे दुसर्या प्रभागात जोडल्या गेल्याचीही तक्रार हिंगोलीत केली जात आहे.
यासोबतच वसमत शहरातही मतदार याद्यांमधील नावांत मोठी गडबड असल्याच्या तक्रारी आहेत. एका प्रभागातील अनेक मतदारांची नावे वेगवेगळ्या चार ते पाच प्रभागांमध्ये विखुरली गेली असल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे एका प्रभागातील एका भागात असलेल्या मतदारांची नावे काही ठराविक प्रभागातच गेली आहेत, असे नाही. एका प्रभागातील मतदारांची नावे चार ते पाच प्रभागांमध्ये विभागतली गेली असल्याची तक्रार आहे. अशा (Hingoli Election) मतदारांची संख्या एक ते दिड हजार असल्याचे काही पक्षांच्या पदाधिकार्यांचे म्हणणे आहे. अपरोक्षपणे हे सर्व बदल काही विशिष्ट उमेदवार किंवा एखाद्या विशिष्ट पक्षाला लाभ देणारे असल्याचे इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याबाबत गृह चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी वसमत येथील राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
तहसीलदारांनी झटकले हात
हिंगोली शहरातील मतदार याद्यांबाबतच्या तक्रारी काही राजकीय पक्षांनी तहसीलदारांकडे केल्या होत्या. या तक्रारींच्या उत्तरार्थ तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी एक पत्र देऊन जबाबदारी झटकली आहे. १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरून (Hingoli Election) निवडणुक आयोगाने यापूर्वी कार्यक्रम दिला असल्याचे सांगुन नगर पालिका क्षेत्रातील प्रभागांची रचना करणे, प्रभागाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे व सर्व प्रकारच्या दुरूस्त्या करणे याबाबतची कार्यवाही नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांच्या कार्यकक्षेतील बाब असल्याचे त्यांच्या पत्रात नमुद आहे.
२८ ऑक्टोंबर पूर्वी सर्व आक्षेपांची तपासणी होईल- मुख्याधिकारी मुंढे
मतदार याद्यांवर आक्षेप घेण्याची अंतिम तारीख १३ ऑक्टोंबर ही आहे. आक्षेप दाखल झाल्यापासुन शहरात तपासणी सुरू करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी दै. देशोन्नतीशी बोलतांना सांगितले. २८ ऑक्टोंबर ही अंतिम मतदार यादी प्रकाशीत करण्याची तारीख आहे. त्यापूर्वी आलेल्या सर्व आक्षेपांनुसार चौकशी पूर्ण केली जाणार आहे. या चौकशीसाठी नेमलेले पथक प्रत्यक्ष मतदारांच्या घरी भेट देऊन वस्तुस्थिती जाणुन घेणार आहेत. यानंतर प्राप्त अहवालानुसार (Hingoli Election) अंतिम मतदार यादी तयार करून २८ ऑक्टोंबर रोजी प्रकाशित केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी मुंढे यांचे म्हणणे आहे.