गांधीजी पुण्यतिथी विशेष
वर्धा(Wardha) :- बापूंनी त्यांचा खून करण्यास टपलेल्यांना आवाहन करताना पुण्यातील सभेत म्हटले होते, ‘ज्यांना मला मारायचे आहे, मारावे, पण माझ्या सोबतच्या लोकांना इजा पोहोचवू नका!” सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा, यावर निष्ठा ठेवून जगलेले देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्त्व करणारे बापू त्यांच्या विचार, आचरणातून वेळोवेळी प्रगट होते. म्हणूनच बापू म्हणायचे ‘माझे जीवनच माझा संदेश आहे’.
‘माझे जीवनच माझा संदेश आहे’
महात्मा गांधी ३० जानेवारी १९४८ रोजी दिल्लीत प्रार्थनेला जात असताना माथेफिरू नथुराम गोडसे याने पिस्तुलातून गोळ्या झाडून बापूंची हत्या केली होती. आज बापूंची ७६ वी पुण्यतिथी..! बापूंच्या हत्येला ७६. वर्षे झाली तरी बापू त्यांच्या विचारांनी अमर आहे. हेच बापूंचे थोरपण..! बापूंची हत्या(Murder) करण्याचे ३० जानेवारी १९४८ पूर्वी ६ प्रयत्न झाले होते, अशी कबुली बापूंनीच पुण्यातील ३० जून १९४६ च्या प्रार्थनासभेत बोलताना देत ईश्वराच्या कृपेनेच मी बचावलो, असे म्हटले होते. बापू प्रार्थनेला जाण्याची वेळ पाळत, त्यापूर्वी घ्यायचे औषधही नियमित घेत, पण ज्या दिवशी बापूंची हत्या झाली, त्यादिवशी त्यांना प्रार्थनेला जातानाही थोडा उशिरच झाला होता. त्यांनी औषधही उशिरा घेतले होते.
वधवादी मानसिकतेची टोळी गांधीजींच्या खुनाकरिता १९१७ पासूनच टपली होती
१९३४ पासूनच त्यानी अधिक जोमाने प्रयत्न सुरू केले. १९१७ च्या पहिल्या प्रयत्नात तर इंग्रज सहभागी होते. १५ एप्रिल १९१७ रोजी बापूदुपारी ३ वाजता बिहारच्या मोतिहारी रेल्वे स्थानकावर उतरले. मोतिहारीच्या इंडिगो कारखान्याचे (Indigo Factories) व्यवस्थापक एर्विन यांनी जेवायला आमंत्रित केले होते. गांधीजींनी आमंत्रण स्वीकारले पण साप्ताहिक उपवासाचा दिवस असल्याने भोजन नाकारले. एर्विनने त्यांना दुधाचा ग्लास तरी स्वीकारा, अशी विनंती केली. एर्विनचा स्वयंपाकी बख्तरमियाँ अन्सारी याला दुधात विष टाळण्याचा आदेश दिला होता. बख्तरमियाँने दुधाचा पेला आणला खरा, पण अनाडी असल्याचे भासवून पेला सांडविला. ते दूध मांजर पिले आणि मरण पावले.