गडचिरोली (Gadchiroli) :- वन्यप्रांण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा,नुकसानभरपाई १ लाख रुपये करण्यात यावी किंवा नुकसान झालेल्या प्रमाणात भरपाई द्यावी, नुकसान भरपाईत शेतीच्या इतर साहित्यांचा समावेश करावा. शेतकर्यांना जाहीर केलेला बोनस त्वरित देण्यात यावा यासह विविध मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आज १२ मार्च रोजी शहरातील चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉन येथे आयोजित शेतकरी (Farmer) मेळावा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या शेतकरी न्याय यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांनी शासनाकडे ‘न्यायाची’ मागणी केली.
न्याय यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांनी शासनाकडे ‘न्यायाची’ मागणी
शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते आ.विजय वड्डेटीवार, खा.डॉ. नामदेव किरसान, खा. प्रतिभा धानोरकर, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव कुणाल चौधरी, आ.रामदास मसराम, आ.अभिजीत वंजारी, माजी मंत्री अनिस अहमद, माजी आ. सुभाष धोटे, निरीक्षक सचिन नाईक, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, रवींद्र दरेकर, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड. विश्वजीत कोवासे, प्रकाश इटनकर, माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडलावार, माजी नगराध्यक्ष अॅड. राम मेश्राम , माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, सतीश वारजूरकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला अध्यक्षा अॅड कविता मोहरकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकार्यांनी केंद्र तसेच राज्य शासनाच्या धोरणावर आसुड ओढले. शेतकरी, शेतमजुर, सुशिक्षित बेरोजगार , महिला, युवती यांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा ईशारा यावेळी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, संचालन शहराध्यक्ष सतिश विधाते तर आभार महिला जिल्हाध्यक्षा अॅड. कविता मोहरकर यांनी मानले.
यानंतर सभास्थळापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकरी न्याय यात्रा काढण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.