भिवंडी पासून नांदेड पर्यंत टोळीचे कनेक्शन
वसमत (Cattle Slaughter) : तालुक्यात कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीतील धामणगाव शिवारात सात गोवंशाची कत्तल केलेले अवशेष सापडले होते. जनावरे ठार मारून मांस लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली होती. याप्रकरणी तीन जण कुरुंदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. जनावराची कत्तल करून मांस पळवणार्या या टोळीमध्ये भिवंडी,नांदेड सह विविध भागातील १२ ते १५ आरोपींचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. इतर आरोपीचा शोध सुरू आहे.
वसमत तालुक्यातील कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीतील धामणगाव शिवारात एकाच वेळी (Cattle Slaughter) सात जनावरे कापून त्याचे मांस पळवल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. याप्रकरणी ऋषिकेश प्रल्हाद बेले रा.धामणगाव या शेतकर्याच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरोधात कुरुंदा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यात शेतकर्याच्या आखाड्यावरून त्यांचा बैल चोरीला गेला व दुसर्या शेतकर्याच्या शेताजवळ कापला असल्याची तक्रारीत नमूद आहे. या घटनेत एक बैल चोरून कापला असल्याची तक्रार असली तरी सात जनावरे कापून त्यांचे मांस लांबवल्याचे आढळलेल्या अवशेषावरून स्पष्ट होत आहे.हा फिरता कत्तलखाना सुरू झाल्याने प्रचंड खळबळ उडाली होती.
जनावराची चोरी (Cattle Slaughter) करून जनावरे जागेवरच कापून मांस लांबवणारी ही अजब टोळी गजाआड करण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे आणि त्यांच्या पथकाने तीन आरोपी अटक केले होते. सदर आरोपींच्या समावेश कुरुंदा येथील प्रकरणात असल्याचे निष्पन्न झाल्याने कुरुंदा पोलिसांनी रिजवान ईस्त्याक खॉन रा. महापोली नाका, वजीरनगर,ता. भिंवडी जि. ठाणे, फिरोज मुस्ताक अन्सारी रा. अन्सारीनगर, शांतीनगर रोड, भिंवडी जि.ठाणे आणि शेख नबी शेख नन्तु रा. इसान कॉलणी, देगलुर नाका, नांदेड या तिघांना ताब्यात घेतले आहे. वसमत न्यायालयासमोर त्यांना उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जनावरे कापून त्यांचे मांस लांबवल्याच्या या घटनेमध्ये १२ ते १५ आरोपींचा समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे. तीन आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले असून इतर आरोपीही शोधण्याचे काम स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक व कुरुंदा पोलीस करत आहेत. यातील काही आरोपी भैसा पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्या आरोपींनाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न कुरुंदा पोलिसांचा आहे.पोलीस कोठडीमध्ये या आरोपीकडून काय निष्पन्न होते.यावरून या प्रकरणाचा तपास व जनावरे चोरून जागेवरच कापून जनावराचे मांस लांबवणार्या टोळीने आतापर्यंत असे किती प्रकार केले हे स्पष्ट होणार आहे.नांदेड येथील आरोपी व भिवंडी परिसरातील आरोपी यांची साखळी वसमत तालुक्यापर्यंत कशी पोहोचली यात वसमत परिसरातील कोणी सहभागी आहे का याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. या प्रकरणाचा तपास जमादार भगीरथ सवंडकर करत आहेत.
धामणगाव येथील (Cattle Slaughter) घटनेनंतर वसमत शहर पोलीस ठाणे अंतर्गत मोहोगाव शिवारातही जनावरांचे अवशेष सापडले होते. या प्रकरणी सुद्धा अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र यात अद्याप कोणाला अटक झालेली नाही.
नवे कसाई नवी पद्धत
कुरेशी बिरादरीने जनावरांची खरेदी विक्री व कत्तलखाने बंद ठेवण्याचा संप सुरू केल्यानंतर नवे कसाई उदयास आले त्यांनी नव्या पद्धतीने जनावराचे मांस हॉटेलवाल्यांना व व्यावसायिकांना पुरवण्यासाठी ही नवीन पद्धत शोधून काढली असावी त्यातून वसमत तालुक्यात सात जनावरांचे अवशेष सापडले होते असे अजून किती प्रकार या नव्या कसायांनी केले हे आता चौकशीत निष्पन्न होईल.