कर्तव्यात कसूर, अतिक्रमण आणि अकाली मृत्यूची भीषण मालिका
तुमसर पंचायत समिती अंतर्गत राजकीय वर्तुळात थरार
तुमसर पंचायत समिती अंतर्गत राजकीय वर्तुळात थरार
राहुल भवसागर
हरदोली/सिहोरा (Tumsar Panchayat Samiti) : तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणार्या सिहोरा परिसरात सध्या राजकारणाचे नव्हे, तर भयावह वास्तवाचे दर्शन घडत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कर्तव्यात कसूर, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण आणि दोन हृदयद्रावक अकाली मृत्यू यामुळे ८ लोकप्रतिनिधींना आपले पद गमवावे लागले आहे. या (Tumsar Panchayat Samiti) एकाच परिसरातील लागोपाठच्या घटनांच्या मालिकेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, जनतेमध्ये भीती आणि गूढतेचं वातावरण आहे.
गंभीर ‘कर्तव्य कसूर’ : दोन सरपंचांची थेट पदमुक्ती
सिहोरा परिसरातील सिहोरा आणि वाहणी मोठ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांवर ‘कर्तव्यात कसूर’ केल्याचा गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. शासकीय कामातील निष्काळजीपणा, निधीचा योग्य वापर न करणे किंवा प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाल्यामुळे नागपूर अप्पर आयुक्त च्या आदेशानुसार या दोन्ही सरपंचांना तत्काळ पदमुक्त करण्यात आले आहे. जनतेने विश्वासाने दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार न पाडल्याची ही कठोर शिक्षा असून, सिहोरा परिसरातील कारभारावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अतिक्रमणाचा ‘फास’: सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांवर अपात्रतेची कुर्हाड
एकीकडे कर्तव्य कसुरीची कारवाई होत असतांनाच, दुसरीकडे शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणार्या लोकप्रतिनिधींवर कायद्याचा बडगा उगारला गेला आहे. या कारवाईत गोंडी टोला आणि बपेरा सरपंच, तर हरदोली (सि.)उपसरपंच आणि एक सदस्य आणि दोन गोंडीटोला ते चार ग्रामपंचायत सदस्य असे एकूण ४ ते ५ लोकप्रतिनिधी अपात्र ठरले आहेत. शासकीय जागेवर अतिक्रमण करून लोकप्रतिनिधी पदावर राहता येत नाही, या नियमाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी अपात्र ठरल्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींचे प्रशासन पूर्णपणे कोलमडले आहे.
भयावह वास्तव: दोन कार्यक्षम महिला सरपंचांचा आकस्मिक मृत्यू
या सर्व (Tumsar Panchayat Samiti) राजकीय उलथापालथीपेक्षा अधिक भयावह आणि दुःखद घटना म्हणजे परिसरातील दोन कार्यक्षम महिला सरपंचांचा आकस्मिक मृत्यू होणे. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच, अगदी अल्पावधीत या मुरली आणि गोंदेखारी मधील महिला सरपंचांचे झालेले अनपेक्षित निधन संपूर्ण परिसरासाठी मोठा धक्का आहे. या निधनामुळे ग्रामपंचायतींचे नेतृत्व अचानक संपुष्टात आले असून, परिसरातील नागरिकांमध्ये ‘काहीतरी अशुभ’ घडत असल्याची दबकी चर्चा सुरू आहे.
एकूण ८ लोकप्रतिनिधींची पदमुक्ती आणि अपात्रता
दोन महिला सरपंचांचा अकाली मृत्यू यामुळे सिहोरा परिसरातील राजकारण एका धक्कादायक वळणावर येऊन थांबले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ही अनागोंदी विकासाच्या कामांवर परिणाम करत असून, वास्तविकता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.