‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर, उदगीरकरांचा लष्कराला मानाचा मुजरा!
उदगीर (Tiranga Rally) : ‘जागतिक दहशतवादी व हिंसाचार विरोधी दिन’ आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) या भारतीय लष्कराच्या यशस्वी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर उदगीर शहरात बुधवारी सकाळी उदगीर नगरपरिषद कार्यालयाच्यावतीने देशभक्तीचा जागर करणारी भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली (Tiranga Rally) उत्साहात पार पडली. या रॅलीचे आयोजन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी (Chief Municipal Council) तथा प्रशासक श्री. सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ!
या रॅलीची सुरुवात नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणातून करण्यात आली. प्रारंभी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ’ देण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे (Sub-Divisional Officer Sushant Shinde) यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ झाला. यावेळी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, तहसीलदार राम बोरगावकर, पोलीस निरीक्षक (शहर) दिलीप गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
रॅली फक्त औपचारिक मिरवणूक न राहता, ती एक देशप्रेमाचा संदेश देणारी..
रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, कॅप्टन कृष्णकांत चौक, छत्रपती शाहू महाराज चौक, हुतात्मा स्मारक ते पुन्हा नगरपरिषद कार्यालय या मार्गावर निघालेल्या या रॅलीच्या अग्रभागी अग्निशमन विभागाची मोटरसायकल, त्यामागोमाग प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोटरसायकली, त्यानंतर महिला अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग, त्यापाठोपाठ पुरुष अधिकारी-कर्मचारी, आणि अखेरीस अग्निशमन गाडी असा रचना क्रम होता. संपूर्ण मार्गावर “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” च्या घोषणांनी परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला. ही रॅली फक्त एक औपचारिक मिरवणूक न राहता, ती एक देशप्रेमाचा संदेश देणारी आणि एकात्मतेचा प्रतीक (Symbol Unity) बनलेली प्रेरणादायी घटना ठरली, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
रॅली उदगीर शहरासाठी गौरवाची बाब!
या उपक्रमाचे यशस्वी आयोजन आणि अंमलबजावणीसाठी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्गाने संयुक्त प्रयत्न केले. रॅलीच्या व्यवस्थापनात वाहतूक नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था, सजावट, तसेच शिस्तबद्ध संचलन याकडे विशेष लक्ष दिले गेले. ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या यशस्वीतेमुळे संपूर्ण देशात भारतीय लष्कराचे (Indian Army) कौतुक सुरू असताना, त्याच्या अनुषंगाने आयोजित केलेली ही मोटारसायकल रॅली उदगीर शहरासाठी गौरवाची बाब ठरली. नागरिकांनी रॅलीचे मार्गावर उभे राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.