हिंगोली(Hingoli) :- सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन जात धर्म विरहित व सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी धम्म परिषदांचे आयोजन केले जात असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष डॉ. उपगुप्त महास्थवीर यांनी केले.
सध्याच्या काळात जाती धर्मामध्ये लोकांना विभागून विष पेरण्याचे काम होत आहे
हिंगोली येथील जेतवन बौद्ध प्रशिक्षण केंद्र (Buddhist Training Center)अंधारवाडी च्या वतीने दि. ११ फेब्रुवारी मंगळवार रोजी २३ व्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी भंते धम्मसेवक महास्थवीर हे होते तर उद्घाटक डॉ.उपगुप्त महास्थवीर हे होते. यावेळी प्रमुख धम्मदेशना भिक्खू प्रा. डॉ. खेमधम्मो महाथेरो संयोजक भिक्खू पय्यारतन थेरो , भिक्खू प्रा.डॉ. सत्यपाल महाथेरो, भिक्खू डॉ. इंदिवंस महाथेरो, भिक्खू करुणानंद थेरो, भिक्खू ज्ञानरक्षित थेरो, भिक्खू पय्याबोधी थेरो, भिक्खु महाकशप, भिक्खू नागसेन,भिक्खु पय्यारक्षीत, भिक्खू पय्यावर्धन, भिक्खू पय्यावंस, भिक्खू गगनबोधी यांनी धम्मदेशना दिली. उद्घाटनप्रसंगी पुढे बोलतांना डॉ.उपगुप्त महास्थवीर म्हणाले की, सध्याच्या काळात जाती धर्मामध्ये लोकांना विभागून विष पेरण्याचे काम होत आहे, परंतु धम्मपरिषदांमध्ये तथागत बुद्धाचा समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता, पंचशील, अष्टशील, आर्य अष्टांगिक मार्ग या देशातील प्रत्येक नागरिकांना शिकविण्याचे काम करून देशात समता आणि बंधुत्व टिकून ठेवून भारतीय राज्यघटने मूलतत्त्व सांगितले जातात असे बोलून डॉ. उपगुक्त म्हणाली की, सुसंस्कृत समाज घडविण्याचे केंद्र हे बुद्ध विहार असतात.
भिक्खू संघानेही एकत्र येऊन समाजाला दिशा देण्याचे काम केले जावे
त्यामुळे आम्ही शासनाकडे मागणी करणार आहोत की, यापुढे गाव तेथे महाविहार निर्मितीचे कार्य शासनाने हाती घ्यावे. पंरतु पाळण्यापासून ते जाळण्या पर्यंत प्रत्येक कार्य शासनावर सोपवुन चालणार नाही समाजाची ही काही कर्तव्य आहेत तेव्हा समाजानेही आपली जबाबदारी ओळखून कार्य करणे गरजेचे आहे. तेव्हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (Babasaheb Ambedkar)स्वप्न पूर्णत्वास नेण्याचे कार्य होईल. यावेळी भंते उपगुक्त यांनी धम्मपरिषद कशासाठी असतात. या संदर्भात बोलताना सांगितले की संस्कृत जाती धर्मविरहित समाज निर्मिती करून समाजाला एकत्र आणण्यासाठी व भिक्खू संघानेही एकत्र येऊन समाजाला दिशा देण्याचे काम केले जावे म्हणून धम्मपरिषद असतात असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोट ठेवून धम्म चळवळीतून समाजाने एकत्र यावे असे आवाहन केले, यावेळी त्यांनी कालवश भन्ते काश्यप महाथेरो यांच्या कार्याचे कौतुक करून आजच्या भन्तेनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे असे आवाहन केले. याप्रसंगी प्रास्ताविक भाषणात संयोजक पय्यारतन थेरो यांनी भंते कास्यप यांचे राहिलेले कार्य पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला तसेच या कार्यात विघ्न आणणाऱ्या लोकांना त्यांची जागा समाज दाखवेल असे सांगितले.
सूत्रसंचालन प्रकाश इंगोले यांनी केले तर आभार नंदकिशोर कांबळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुप्रिया महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी व भिकू संघाने परिश्रम घेतले. परिषदेला मोठ्या संख्येने महिला पुरुष व युवकांची उपस्थिती होती. यावेळी भीम शाहीर दिनकर लोणकर व स्थानिक कलाकारांच्या भिम बुद्ध प्रेरणा गीतांचा कार्यक्रम झाला. परिषदेस आलेल्या जनतेसाठी महार रेजिमेंटच्या सेवानिवृत्त सैनिकांनी खिचडीचे वाटप केले तर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पाण्याचे वाटप केले.
