Pusad :- ग्रामीण पोलीस स्टेशन (Police station)अंतर्गत येत असलेल्या बांशी येथे दुर्गा देवीचे जेवण करायला केलेल्या दहा वर्षीय चिमुकल्याचा खोल नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना ३ ऑक्टोंबर रोजी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
दहा वर्षीय चिमुकल्याचा खोल नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू
प्राप्त माहितीनुसार, सत्यशील गणेश केवटे (१० वर्ष) रा. बांशी हा आपल्या घराच्या बाजूला असलेल्या दुर्गादेवी मातेजवळ महाप्रसाद असल्यामुळे त्या ठिकाणी जेवण करायला जात होता. मधात नाला असल्यामुळे ते पार करूनच जावे लागत होते. ३ ऑक्टोंबर २०२५ रोजी च्या दुपारी अंदाजे दीड वाजताच्या सुमारास सत्यशील गणेश केवटे हा नाला पार करत असताना, अचानकपणे तो त्या नाल्यामध्ये पडला. तो नाला खोल असल्यामुळे तसेच पावसामुळे मोठया प्रमाणात पाणी असल्यामुळे सत्यशील यास त्या खोल नाल्याचा अंदाज लागला नाही. आणि यामध्येच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती नागरिकांना होताच, त्यांनी तात्काळ सत्यशील केवटे याचा मृतदेह (dead body) शासकीय उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय पुसद येथे आणला.
मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी उपजिल्हा रुग्णालय गाठून घटनेचा पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सत्यशील केवटे हा तीन वर्षाचा असताना, त्याची आई त्यास सोडून गेली होती. वडील डोक्याने थोडे मनोविकृत असल्यामुळे सत्यशील हा गावातील हॉस्टेलमध्ये राहत होता. या घटनेमुळे बांशी परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. सदर घटनेचा तपास पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रवींद्र गावंडे यांचे सह पोलीस अंमलदार जावेद खान करीत आहेत.




