माजी मुख्याध्यापक प्रामुख्याने उपस्थित!
रिसोड (Tree Rakshabandhan) : ‘वृक्ष रक्षति रक्षितः’ अर्थात मानवाकडून जर वृक्षांचे रक्षण झाले, तर वृक्ष सुध्दा सदा-सर्वदा मानवाचे रक्षण केल्याशिवाय राहणारचं नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. वृक्ष हे फक्त हवामानाचा समतोलचं साधत नाहीत, तर विविध प्रकारच्या औषधी व फळरूपी अन्नाद्वारे सजीवांचे पालनपोषण सुद्धा करतात. सदर्हु वक्तव्य कार्यक्रमाचे आयोजक वृक्षमित्र गजानन मुलंगे ह्यांनी संत सातारकर महाराज संस्थान रिसोड, येथे आयोजित ‘वृक्ष-रक्षाबंधन’ कार्यक्रमादरम्यान, व्यक्त केले. कार्यक्रमाकरिता दत्तराव देशमुख अध्यक्ष, श्रीराम नरवाडे व्यवस्थापक, मुरलीधर पवार सदस्य, परसराम नरवाडे सदस्य, सोपान महाराज सदस्य संत सातारकर महाराज संस्थान रिसोड, विष्णु जटाळे वनपाल सामाजिक वनिकरण वाशिम परिक्षेत्र रिसोड, महादेवराव पावडे नगर संघ चालक, पंडितराव देशमुख माजी नगराध्यक्ष रिसोड, विठ्ठल सारोळकर मुख्याध्यापक महात्मा फुले विद्यालय रिसोड, मदन चौधरी माजी मुख्याध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते.
महिलांनी प्रत्येक वृक्षाला राखी बांधतांना वृक्ष रक्षणाचा संदेश दिला!
उपस्थित महिला मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम बेल वृक्षाच्या बुडाशी दिप प्रज्वलीत करून वृक्षाला राखी (Rakhi) बांधण्यात आली. उपस्थित महिलांनी प्रत्येक वृक्षाला राखी बांधतांना वृक्ष रक्षणाचा संदेश दिला. कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करतांना मुलंगे म्हणाले कि, साधारणतः 1990 च्या नंतर हाडांमध्ये ठिसुळपणा निर्माण होणे, अकाली मधुमेहाने ग्रस्त होणे, रक्तामधील पेशींचे प्रमाण कमी-जास्त होणे, काळजाच्या ठोक्यांची संख्या कमी-जास्त होणे इत्यादि व्याधी मध्ये आतोनात वाढ झाली. ह्याचे मुख्य कारण म्हणजे मानव आणि निसर्गामध्ये निर्माण झालेला दुरावा होय. उपर्युक्त एक नाही, तर अनेक व्याधी टाळायच्या असतील, तर वृक्षांचे बहुमोल अवयव अर्थात मुळं, खोड, खोडाची साल, पान, फुल इत्यादींशी सलगी करणे काळाची गरज आहे. कार्यक्रमादरम्यान, उपस्थितांनी प्रत्येक वृक्षाला राखी बांधून वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता उषा मिटकरी, रेखा पवार, श्रावणी बरडे, वेदिका थोरात, इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कोमल डांगे तर आभार गणेश पवार ह्यांनी मानले.