हिंगोली (Truck motorcycle Accident) : वसमत तालुक्यातील थोरावा पाटी जवळ भरधाव ट्रकने मोटार सायकलला धडक दिल्याने त्यावरील एकजण ठार झाला असुन एक जण जखमी झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिसात २८ मे रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, परभणी जिल्ह्यातील फुलकळस येथील भिमाशंकर उर्फ समाधान कनकुटे (२२) हा मित्र सोनू साबळे याच्यासोबत मोटार सायकलवरून नातेवाईकांना भेटण्यासाठी नांदेडला गेले होते. मुक्काम झाल्यानंतर दोघेही मोटार सायकलवरून २७ मे रोजी सकाळी वसमत मार्गे परभणीकडे निघाले होते. वसमत तालुक्यातील थोरावा पाटी जवळ ट्रक क्रमांक एमएच १६ सीडी ९४३३ च्या चालकाने त्यांच्या मोटार सायकलला समोरून धकड दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते.
दोघांना पोलिसांनी वसमत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता भिमाशंकर उर्फ समाधान कनकुटे (२२) याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तर गंभीर जखमी असलेला सोनू याच्यावर प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात पाठविले. परंतु तेथेही त्याची प्रकृति चिंताजनक झाल्याने पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिसात गौतम कनकटे याच्या फिर्यादीवरून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.




