मर्केटर प्रोजेक्शनमुळे आफ्रिका लहान तर ग्रीनलँड मोठा दिसतो; ‘Correct the Map’ मोहिमेतून टोगोचा पुढाकार
जगाचा नकाशा पाहताना आपण ज्या भौगोलिक आकारांना खरे मानतो, त्यामागे प्रत्यक्षात नकाशा तयार करण्याच्या पद्धतीचा मोठा प्रभाव असतो. आफ्रिका खंडाचे याच कारणामुळे दीर्घकाळापासून तुलनेने कमी आकाराचे चित्र जगासमोर गेले आहे. आता या पारंपरिक मांडणीला पर्याय देण्यासाठी समान-क्षेत्रफळ दाखवणाऱ्या ‘Equal Earth’ नकाशाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र महासभेत चर्चेत येत आहे.
सध्याच्या नकाशांमध्ये आफ्रिका आणि ग्रीनलँडचा आकार जवळपास समान असल्याचा भास होतो. मात्र, प्रत्यक्षात आफ्रिका खंडाचे क्षेत्रफळ सुमारे 3 कोटी चौरस किलोमीटर असून ग्रीनलँडचे क्षेत्रफळ केवळ 21 लाख चौरस किलोमीटर आहे. म्हणजेच आफ्रिका ग्रीनलँडपेक्षा तब्बल 14 पट मोठा आहे. आफ्रिकेच्या विशालतेची खरी कल्पना यावरून येते की, या खंडात संपूर्ण अमेरिका, चीन, भारत आणि युरोपमधील बहुतांश देश सामावू शकतात.
The UN General Assembly will vote on Friday on an African initiative (draft resolution) to replace the 16th-century Mercator map projection with the geographically accurate Equal Earth map, following an African Union resolution addressing historical size distortions that shrink… pic.twitter.com/QqFy0LSdw1
— Sherwin Bryce-Pease (@sherwiebp) September 3, 2026
500 वर्षांहून अधिक जुन्या नकाशाला पर्याय
जगभरात दीर्घकाळ वापरला गेलेला मर्केटर प्रोजेक्शन 1569 मध्ये डच नकाशाकार जेरार्डस मर्केटर यांनी तयार केला होता. पृथ्वीचा गोलाकार आकार सपाट कागदावर मांडताना या पद्धतीचा वापर करण्यात आला. विशेषतः समुद्रमार्ग आणि नौकानयनासाठी दिशा निश्चित करण्याच्या दृष्टीने हा नकाशा उपयुक्त ठरला.
मात्र, या प्रोजेक्शनची एक महत्त्वाची मर्यादा आहे. पृथ्वीच्या ध्रुवांच्या दिशेने असलेले प्रदेश त्यांच्या वास्तविक क्षेत्रफळापेक्षा मोठे दिसतात. त्याउलट विषुववृत्ताच्या आसपासचे आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका यांसारखे प्रदेश तुलनेने लहान भासतात.
फोटोतील दोन नकाशांमध्ये नेमका फरक काय?
डावीकडील मर्केटर प्रोजेक्शनमध्ये ग्रीनलँड गडद लाल रंगात तर आफ्रिका पिवळ्या रंगात दाखवली जाते. या मांडणीत ग्रीनलँडचा आकार आफ्रिकेच्या जवळपास किंवा त्याहून मोठा असल्याचा आभास निर्माण होतो. नकाशाच्या खालच्या भागात असलेला अंटार्क्टिका देखील वास्तविक आकारापेक्षा खूपच पसरलेला दिसतो.
याचे कारण म्हणजे मर्केटर प्रोजेक्शनमध्ये दिशा अचूक ठेवण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे ध्रुवांच्या जवळील भूभागाचे क्षेत्रफळ मोठे दिसते.
उजवीकडील समान-क्षेत्रफळ नकाशात मात्र भूप्रदेशांचे परस्पर क्षेत्रफळ अधिक वास्तव पद्धतीने दिसते. त्यामुळे आफ्रिकेचा प्रचंड विस्तार स्पष्ट होतो, तर ग्रीनलँडचा आकार आफ्रिकेच्या तुलनेत अत्यंत लहान दिसतो. या प्रकारच्या नकाशाचा उद्देश पृथ्वीवरील विविध प्रदेशांचे वास्तविक सापेक्ष क्षेत्रफळ दाखवणे हा आहे.
‘Correct the Map’ मोहिमेत टोगोचा पुढाकार
आफ्रिकन युनियनच्या पाठिंब्याने टोगोने संयुक्त राष्ट्रांमध्ये ‘Equal Earth’ नकाशा मॉडेल स्वीकारण्याची मागणी पुढे केली आहे. ‘Correct the Map’ या जागतिक मोहिमेच्या माध्यमातून ही भूमिका मांडली जात आहे.
या मोहिमेशी संबंधित कार्यकर्त्यांच्या मते, मर्केटर नकाशाचा परिणाम केवळ भौगोलिक आकलनापुरता मर्यादित राहिलेला नाही. या नकाशामुळे जगाच्या मानसिकतेत आफ्रिकेचे महत्त्व तुलनेने कमी भासले आणि युरोप तसेच पाश्चात्त्य देशांचे महत्त्व मोठे दिसले, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे हा मुद्दा केवळ नकाशाशास्त्राचा नसून वसाहतवादी मानसिकतेशीही संबंधित असल्याचे या मोहिमेचे समर्थक मानतात.
UN च्या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो?
संयुक्त राष्ट्र महासभेत या प्रस्तावावर होणारे मतदान कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नसेल. मात्र, UN कडून प्रस्तावाला समर्थन मिळाल्यास त्याचा जागतिक पातळीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
शाळांमधील नकाशे, शैक्षणिक प्रकाशने, डिजिटल मॅपिंग प्लॅटफॉर्म आणि गुगल मॅप्ससारख्या तंत्रज्ञान कंपन्यांना अधिक वास्तव क्षेत्रफळ दाखवणाऱ्या नकाशांचा वापर करण्यासाठी त्यातून प्रोत्साहन मिळू शकते. त्यामुळे पुढील पिढीला जगातील देश आणि खंडांचे आकार अधिक अचूकपणे समजण्याची संधी मिळेल.
पाच शतकांहून अधिक काळ प्रचलित असलेल्या युरोप-केंद्रित भौगोलिक प्रतिमेला बदलण्याच्या दृष्टीने ‘Correct the Map’ ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे. आता संयुक्त राष्ट्रातील सदस्य देश या प्रस्तावाबाबत कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.