कोरची (Korchi Nagar Panchayat) : येथील नगरपंचायत हद्दीत 2017-18 मध्ये सिटी सर्वे करून सनदा आणि आखिव पत्रिका देण्यात आले. परंतु यात मोठ्या प्रमाणात चुका झाल्या आहेत. त्यामुळे पुनश्च सिटी सर्वे करून नव्याने सनदा आणि आखिव पत्रिका देण्याची मागणी कोरची येथील नागरिकांनी केली आहे.
2017-18 मध्ये भूमी अभिलेख कार्यालय कोरची कडून (Korchi Nagar Panchayat) कोरची नगरपंचायत हद्दीत असलेल्या संपूर्ण घरे, रिकामी जागा व मिळकतींचे सिटी सर्वे करून सनदा आणि आखिव पत्रिका देण्यात आले. या मधील भूमापन क्रमांक आणि सातबारा यातील भूमापन क्रमांक जुळत नाही.आराजी सुद्धा जुळत नाही.सातबारा वरून ज्या जागेत घरे आहेत, ती घरे सनदा व आखिव पत्रिका दुसऱ्याच जागेत दाखविण्यात आले आहे.
त्यामुळे येथील नागरिकांचे कोणत्याही प्रकारचे शासकीय लाभ मिळत नाही. बऱ्याच लोकांना सनदा व आखिव पत्रिका मिळाल्याच नाही. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की, या गावात आबादीची जागा कमी आहे. या आबादी च्या जागेत दाटीवाटीने घरे आहेत. परंतु गावाला लागूनच झुडपी जंगल सरकारी जागा होती. त्या जागेत 40/50 वर्षापासून घरे बांधून लोक वास्तव्यास आहेत. त्या लोकांना मिळालेल्या सनद आणि आखिव पत्रिकेत मालकाचे नाव महाराष्ट्र शासन असे लिहिले आहे. अशी नोंद असलेली 300 ते 350 घरे आहेत.
हे कुटुंब गरिब असून त्यांना मिळालेल्या सनदा वरील मालकाचे नाव महाराष्ट्र शासन अशी नोंद असल्याने या लोकांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही.या लोकांना घरकुलाची अत्यंत आवश्यकता आहे.अशा प्रकारच्या झुडपी जंगल जागेत ज्यांची घरे आहेत, त्यांना त्यांच्या नावे सनदा व आखिव पत्रिका देण्यात यावे असे महाराष्ट्र शासनाने भूमी अभिलेख कार्यालयांना कळविले आहे. परंतु (Korchi Nagar Panchayat) कोरची येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी या निर्णयाला केराची टोपली दाखविले आहे.
ही समस्या अधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय गडचिरोली यांना सांगण्यात आले आहे. सदर सनदा आणि आखिव पत्रिका दुरूस्ती करून देण्यासाठी त्यांनी कोरची येथील भूमी अभिलेख कार्यालयाला कळविले आहे. परंतु अद्याप कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कोरची नगरपंचायत हद्दीत नव्याने सिटी सर्वे करून नव्याने सनद आणि आखिव पत्रिका देण्यात यावे अशी मागणी कोरची येथील नागरिकांनी केली आहे.
गडचिरोली येथील प्रभार मी आता नुकताच घेतलेला आहे त्यामुळे याबद्दलची मला काही कल्पना नाही माहिती घेऊन यावर काय करता येईल हे पुढच्या आठवड्यात सांगतो
-विजय भालेराव, जिल्हा भुमि अधिक्षक, गडचिरोली




