गडचिरोली (Gadchiroli) :- यावर्षीच्या पावसाळयात रोहीणी व मृग नक्षत्रात पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नाही. आता आर्द्रा नक्षत्रात बर्यापैकी पाऊस पडत आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर , पश्चिम भागात अतिवृष्टी (heavy rain) झाल्यानंतर वैनगंगा नदी फुगते .यामुळे गोसीखुर्द धरणातून मोठया प्रमाणात पाणी सोडले जाते. हे पाणी अवघ्या ७ तासात गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज सिमेत पोहचते. आता पावसाळा (Monsoon) सुरू झाला असल्याने नागरीकांना सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.
२०२२ मध्ये बसला होता महापुराचा फटका
गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व सीमेवरुन वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, गोदावरी आणि इंद्रावती ह्या पांच नद्या वाहतात. वैनगंगा नदी ही जिल्ह्याच्या आरमोरी, गडचिरोली व चामोर्शी या तालुक्याच्या पश्चिम सीमेवरुन वाहत जाऊन चामोर्शी तालुक्यातील चपराळा या ठिकाणी वर्धा नदीला मिळते. या दोन्ही नद्यांच्या संयुक्त प्रवाहाला त्यानंतर प्राणहिता नदी या नावाने ओळखल्या जाते . ही नदी पुढे जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरुन वाहत जाऊन सिरोंचा येथे गोदावरी नदीला मिळते. इंद्रावती नदी सिरोंचा, एटापल्ली आणि अहेरी तालुक्याच्या दक्षिण-पूर्व सीमेवरुन वाहत जाऊन सिरोंचा तालुक्यातील सोमनूरजवळ गोदावरी नदीस मिळते. तसेच वेगवान प्रवाह असणार्या बांडिया, पर्लकोटा आणि पामलगौतम या नद्या इंद्रावतीस मिळतात.
याशिवाय गाढवी, खोब्रागडी, कठाणी, वैलोचना आणि दिना या नद्या जिल्ह्याच्या उत्तर भागात वाहतात. त्यापैकी पहिल्या चार नद्या वैनगंगेस तर दिना नदी प्राणहिता नदीस मिळते. अशा प्रकारे गडचिरोली जिल्हा उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व या दिशांना पाच मोठ्या नद्यांनी वेढलेले असून इतर नद्या आणि नाले जिल्ह्याच्या विविध भागात वाहत असल्यामुळे सतत पाऊस पडल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असतो. अतिवृष्टि व पुरामुळे जिल्ह्यातील गडचिरोली -चामोर्शी, गडचिरोली- आरमोरी, भामरागड – आलापल्ली आणि कुरखेडा या मार्गावरील वाहतूक प्रभावित होत असते.