साहित्यातील योगदानासाठी झाला रशियात सन्मान
नांदेड (Dr. Prithviraj Taur) : रशियातील मास्को येथे दिनांक २०-२१ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित वर्ल्ड पब्लिक असेंबली मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख व लेखक डॉ.पृथ्वीराज तौर (Dr. Prithviraj Taur) यांना जागतिक साहित्याच्या विकासात योगदान दिल्याबद्दल प्रतिष्ठित सिल्वर मेडलने सन्मानित करण्यात आले. वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ राईटर्सच्या अध्यक्ष मार्गारिता अल यांनी पुरस्कारांची घोषणा केली. युनेस्को च्या सद्भावना दूत अलेक्झांद्रीया ओचिरोव्हा यांच्या हस्ते सिल्व्हर मेडल प्रदान करण्यात आले.
वर्ल्ड पब्लिक असेंबलीच्या निमित्ताने त्रेसष्ट देशातील लेखक वॉवच्या दुसऱ्या जागतिक परिषदेसाठी आले आहेत. त्यावेळी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. भारतीय लेखक म्हणून डॉ. तौर (Dr. Prithviraj Taur) यांचा गौरव करण्यात आला. तौर यांच्या समवेत अन्य चार देशातील लेखकांनाही सिल्वर मेडल ने सन्मानित करण्यात आले.
परिषदेच्या विशेष सत्रात डॉ. पृथ्वीराज तौर (Dr. Prithviraj Taur) यांनी अनुवादित केलेल्या व प्रा. स्वाती काटे यांनी संपादित केलेल्या ‘आनंदोत्सवाचा विश्वसेतू’ या संग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध इजिप्तचे सुप्रसिद्ध कवी अशरफ दाली आणि आफ्रिका लेखक संघटनेचे महासचिव डॉ वले ओकेदिरान यांच्या हस्ते करण्यात आले. संग्रहात पंचवीस देशातील चाळीस कवींच्या कवितांचे मराठी भाषांतर समाविष्ट करण्यात आले आहे.
जागतिक परिषदेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. तौर (Dr. Prithviraj Taur) गोलमेज परिषदेत ‘ सहलेखक म्हणून अनुवादकाचे अस्तित्व’ या विषयावर ते वक्तव्य दिले. अमेरिकेतील टस्कगी विद्यापीठातील प्रा. बिल एफ एनडी अध्यक्षस्थानी होते. जागतिक पातळीवरील साहित्याचे प्रतिष्ठीत सिल्व्हर मेडल प्राप्त झाल्याबद्दल डॉ पृथ्वीराज तौर यांचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर आणि साहित्य शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.