प्रवाशांच्या जीवाशी खेळ.!
बस सुरू असताना फुटली होती डिझेल टैंक!
यवतमाळ (Yavatmal) : उन्हाळ्याच्या दिवसात एसटी बसेस (ST Buses) बंद पडण्याचे प्रकार वाढले असून, या बंद पडत असलेल्या बसेसचा नागरिकांना मोठा फटका सहन करावा लागतो आहे. प्रवास कमी पल्ल्लाचा असेल, तर एसटी बसमधून प्रवासाला प्राधान्य दिलं जातं. पण, परिवहन विभागाच्या अनेक बस मुदतबाह्य झालेल्या आहेत, त्या वाहतुकीच्या योग्य नाहीत मात्र अशा भंगार बसेसचा वापर प्रवासी वाहतूकीसाठी राज्य पहिवहन महामंडळाकडून करण्यात येत असल्याने प्रवासी व वाहन चालकांचा जीव धोक्यात घातल्या जात आहे.
नादुरुस्त बसची तात्पुरती दुरुस्ती..
बुधवारी 26 मार्च रोजी एसटी महामंडळाची बस यवतमाळ डेपो मधून निघाल्यावर, स्टेट बैंक चौकात बंद पडली. अवघ्या 1 किमी अंतरावर बस बंद पडली होती, तर 17 मार्च रोजी. अर्ली गावाजवळ अर्ली ते घाटंजी मानव विकास मिशनची बसची डिझेल टैंक (Bus Diesel Tank) खाली पडली होती. जवळपास अर्धा किमी पर्यंत टैंक रस्त्यावर घासत गेल्याने डिझेल टैंक फुटली. डिझेल रस्त्यावर वाहून गेले. नादुरुस्त बसची तात्पुरती दुरुस्ती करून त्या प्रवासी वाहतूकीकरिता रस्त्यावर उतरविल्या जात आहे. पण, परिवहन विभाग याला गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (ST) सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या यवतमाळ विभागातील अर्धाअधिक बसचे आयुर्मान 15 वर्षांहून अधिक झाले आहे.
प्रवासी वाहतुकीकरिता दररोज रस्त्यावर धावतात..
या खिळखिळ्या झालेल्या जुन्या बस अद्याप मार्गावर धावत असल्याने, त्या रस्त्यामध्ये बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे प्रवाशांचा महत्वाचा वेळ वाया जातो, त्याच बरोबर मनस्तापदेखील सहन करावा लागतो आहे. एसटीने महिलांसाठी सन्मान योजना जाहीर केल्यानंतर, सर्वच भागांत प्रवाशांची गर्दी वाढली आहे. यवतमाळ विभागातून सुटणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची गर्दी असली, तरी विभागाकडे पुरेशा बसच नाहीत. उपलब्ध बसपैकी 60 टक्क्यांपेक्षा जास्त बस चौदा वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्या खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे बस संचालनावर परिणाम होत आहे. यवतमाळ विभागात एकूण 8 आगार असून विभागाकडे साधारण 384 बस असून त्या प्रवासी वाहतुकीकरिता दररोज रस्त्यावर धावतात तर 11 बसेस बंद पडल्या आहेत तर 20 नवीन बसेस आताच दोन आगाराला मिळाली आहे. जिल्ह्यासाठीच्या 384 बसपैकी अर्धापेक्षा जास्त बसेस प्रवासी वाहतुकीसाठी अनफिट आहेत. त्यामुळे जिल्ह्याला एसटीची प्रवासी वाहतूक सुरक्षित करायची असेल, तर चांगल्या स्थितीतील बसेस राज्य परिवहन महामंडळाकडून (State Transport Corporation) उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे, अन्यथा प्रवाश्यांना आपला जीव धोक्यात घालून एसटीचा प्रवास करावा लागणार आहे.
14 लाख किलोमीटर बदलविल्या जाते एसटी बसचे इंजिन!
आगारात अनेक जुन्या बसला रंगरंगोटी करून बसेस आणल्या जात आहे व त्या बसेस रस्त्यावर धावल्या जातात. मात्र रंगरंगोटी केल्याने बस नवीन दिसतात, मात्र त्यातील इंजिन नेमके कसे आहे. याची कल्पना प्रवासांना नसते. प्रत्येक एसटी बसचे इंजिन बस 14 लाख किलोमीटर चालल्यावर नंतर बदलवावे लागते मात्र, ते बदलविण्यात येते किंवा नाही हा कळीचा मुद्दा आहे. एसटी मंडळाच्या बसेस रोज अनेक लांब पल्ल्याच्या फेऱ्याची व कमी पल्ल्याच्या फेऱ्यांचा प्रवास करित असल्याने यवतमाळ विभागातील अनेक बसेस 14 लाख किलोमीटर अंतर प्रवास करून झाल्या असल्याची शक्यता आहे.