उमरखेड (Yawatmal) :- अतिक्रमणात घराचे बांधकाम का करतो असे म्हणून घराशेजारी राहणार्या तिघा बापलेकांनी शेजारी बापलेकांना लोखंडी रॉडने गंभीर जखमी केल्याची घटना १२ मे रोजी सकाळी ७ वाजताचे सुमारास विडूळ येथे घडली. फिर्यादी डॉ.शिवचरण हिंगमिरे (६३) रा. विडूळ यांनी उमरखेड पोलीस स्टेशनला (Police station) दिलेल्या फिर्यादीवरून तिघा विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
विडूळ येथील घटना; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
विडूळ येथे वैद्यकिय व्यवसाय करणारे फिर्यादी डॉ. शिवचरण यांच्या घराचे बांधकाम (Construction) मागील सात महिण्यापासुन सुरु आहे. फिर्यादी यांचे घराशेजारी आरोपी सतिष टपरे यांचे घर असुन फिर्यादीस तुम्ही अतिक्रमण करुन घर बांधत आहे, असे म्हणुन मागील सात महिण्यापासुन फिर्यादी सोबत वाद घालत आहे. आज १२ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारात फिर्यादीचे घराचे बांधकाम चालु असल्याने खड्डे खोदले होते. त्यात ड्रेनेजचे पाईप टाकण्याचे व पिलर बांधण्याचे काम चालू असतांना शेजारी सतिष टपरे (६१) त्याचा मुलगा अभिजीत टपरे (३५) दोन्ही रा. विडुळ हे तेथे आले व सतिष हा फिर्यादीला म्हणाला की, तुम्ही असे कसे काय अतिक्रमणमध्ये घराचे बांधकाम करता..? तुमचे घराचे खड्डे मी बुजून टाकतो. असे म्हणून शिवीगाळ (Abusing) करु लागला. तेव्हा त्यास फिर्यादीने समजावुन सांगीतले की, माझे घराचे बांधकाम अतिक्रमण मध्ये असेल तर तु ग्रामपंचायतमध्ये तक्रार कर, माझ्या सोबत वाद करु नको असे म्हटले असता आरोपी सतिषने त्याचे हातातील लोखंडी रॉडने माझ्या डोक्यावर मारुन गंभीर जखमी केले.
शिवीगाळ करुन तुम्ही येथे बांधकाम केले तर जीवाने मारून टाकतो अशी दिली धमकी
तेव्हा फिर्यादी शिवचरण यांचा मुलगा शुभम याने त्याचे तावडीतुन सोडवत असतांना आरोपीचा मुलगा अभिजीत टपरे याने त्याचे हातातील लोखंडी रॉडने मुलाचे डोक्यावर मारुन त्यासही गंभीर जखमी केले. तेव्हा तेथे आरोपीचा दुसरा मुलगा विश्वजीत (३२) वर्षे हा सुद्धा तेथे आला. तेव्हा वरील तिघांनीही संगणमत करुन फिर्यादी व त्यांचे मुलाला चापट बुक्क्यांनी मारुन खाली पाडले व मारहाण केली त्यामध्ये फिर्यादी यांच्या पाठीवर, डाव्या हातावर व मुलाचे उजव्या हातावर, पाठीवर, पायावर मारहाण केली. व तिघांनीही शिवीगाळ करुन तुम्ही येथे बांधकाम केले तर जीवाने मारून टाकतो अशी धमकी दिली. अशा आशयाच्या फिर्यादीवरुन उमरखेड पोलीसांनी तीघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार राजूसिंग पवार पुढील तपास सुरु आहे.