यवतमाळ(Yawatmal):- बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच अधिकाऱ्यांच्या रूटीन पार्टीत चक्क वाहनातून साडेतीन लाख रुपये लांबवले. चोरीची घटना घडताच सीसीटीव्हीची (CCTV)तपासणी केली असता उपाध्यक्षाच्या माजी वाहन चालकाने पैसे उडवल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पोलिसांनी हिसका दाखवताच चोरट्याने कबुली देत पैसे सुद्धा परत केले. मात्र, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नाही. लोहारा परिसरातील त्या पार्टीची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे.
लोहऱ्याच्या पार्टीतील प्रकार: सीसीटीव्हीत झाला घटनाक्रम कैद
लोहारा परिसरात बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच अधिकाऱ्यांची रूटीन पार्टी चालू होती. बोटावर मोजण्याइतके लोकांना या पार्टीची माहिती होती. यावेळी त्याच परिसरात उभी ठेवलेल्या अध्यक्षाने वाहनात लाखोची कॅश ठेवली होती. ही बाब हेरून उपाध्यक्षांच्या वाहनावरील माजी चालकाने वाहनाची काचे फोडून पैसे काढून घेतले. परत आल्यानंतर पैसे चोरीला गेल्याची बाब समोर आली. पार्टीत उपस्थित असलेल्या सर्वांना विचारपूस केली. मात्र, कुणीही काहीच बोलले नाही. शेवटी प्रकरण पोलिसांकडे पोहचले. पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. तसेच सीसीटिव्हीची तपासणी केली. तेंव्हा त्या चालकाने पैसे घेतल्याची बाब उजेडात आली.