येहळेगाव सोळंके/हिंगोली (Maratha Reservation) : औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा देत गावातील महिलांनी व तरुणींनी अनोख्या पद्धतीने बांधवांना शुभाशीर्वाद दिले. मुंबईला आंदोलनासाठी रवाना होणार्या मराठा बांधवांचे जिजाऊंच्या लेकींनी पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. या (Maratha Reservation) औक्षण सोहळ्यात महिलांनी हातात दिवे व मेणबत्त्या घेऊन रांग लावली होती. पारंपरिक नऊवारी नेसलेल्या मातृशक्तीच्या डोळ्यांतून समाजासाठीची चिंता आणि बांधिलकी स्पष्ट जाणवत होती. औक्षणानंतर वातावरण घोषणांनी दुमदुमून गेले.
युवकांनी यावेळी एकच आवाज दिला. ‘एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय.. ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बाप्पाचं.. ‘जरांगे पाटील तुम आगे बढो, हम आपके साथ है.. या घोषणा देत युवक मुंबईकडे निघाले. महिलांनी व गावकर्यांनी त्यांना शुभाशीर्वाद दिले आणि न्याय्य हक्कासाठीच्या या लढ्यात यश मिळावे यासाठी प्रार्थना केली. गावातील लहान मुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या औक्षण सोहळ्यामुळे गावात भावनिक आणि ऐतिहासिक असे वातावरण निर्माण झाले. (Maratha Reservation) समाजाच्या संघर्षात मातृशक्तीचा सहभाग ठळकपणे जाणवला. गावकर्यांनी एकमुखाने सांगितले की, ‘मराठा समाजाच्या लढ्यात आम्ही ठाम आहोत. हे आंदोलन यशस्वी होणारच.
आंदोलनाची पार्श्वभूमी
मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. या (Maratha Reservation) मागणीसाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने, मोर्चे आणि उपोषणे झाली आहेत. गेल्या काही महिन्यांत या चळवळीला आणखी वेग आला असून गावोगावी जनजागृतीसाठी कार्यक्रम होत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे समाजात प्रचंड ऐक्य निर्माण झाले आहे. न्याय्य हक्कासाठी हा लढा आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून राज्य सरकारवर तातडीने निर्णय घेण्याचा दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर येहळेगाव सोळंके येथील औक्षण सोहळ्याने समाजाच्या लढ्याला भावनिक बळ दिले आहे. मातृशक्तीचा मिळालेला पाठिंबा आणि युवकांचा जाज्वल्य उत्साह या आंदोलनाला निश्चितच अधिक ताकद देणारा ठरत आहे.