बेरोजगार मुलांना मुलगी देण्यास मुलींचे पालक धजावेनात!
उमरगा (Youth Employment) : शिक्षण घेऊन सरकारी नोकरी मिळवायची, या आशेने शिकून नोकरी मिळत नसलेल्या व हाताला काम नसलेल्या बेरोजगार मुलांना मुलगी देण्यास मुलींचे पालक धजावत नसल्याचे वास्तव दिसून येत आहे. इतकेच नव्हे, तर केवळ सरकारी नोकरदारच असावा, यासह मुलींच्या पालकांच्या अवास्तव अपेक्षांमुळे सोयरीक जुळण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
पैसे देऊन विवाहासाठी दिग्गज पालक मुलींच्या शोधात!
मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर किमान 9 टक्क्यानी कमी झाला आहे. शुभविवाहासाठी (Auspicious Marriage) उपवर मुलांना मुली मिळणे दिवसें-दिवस कठीण झाले आहे. एकेकाळी मुलांना हुंडा (Dowry) देण्याची पद्धत रूढ होती. ही पद्धत आता मोठया प्रमाणात कमी झाली असून, पैसे देऊन विवाहासाठी दिग्गज पालक मुलींच्या शोधात असल्याचे चित्र आहे. उपवर मुलांच्या पालकांनी अनाथ आश्रमातील मुलींचा विवाहाकरिता शोधा-शोध सुरु केली आहे.
शेती पाहिजे, पण शेतकरी नवरा नको गं बाई!
निसर्गाच्या लहरी पणामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. शेती व्यावसायाबाबत शाश्वती नसल्यामुळे शेती करणाऱ्या मुलाबरोबर लग्न करण्यासाठी मुली व पुलींचे पालक धजावत नसल्याचे चित्र आहे. शेती पाहिजे, पण शेतकरी नवरा नको गं बाई, असे मत वधूंच्या पालकातून (Parents) व्यक्त होत आहे. आजच्या मुली उच्चशिक्षित झाल्या आहेत. प्रत्येक मुलामुलींच्या आईवडिलांना आपल्या मुलीला सरकारी नोकरीचा नवरा मिळावा. भले नोकरी असली तरी शेतजमीन असावी. पुणे मुंबईसारख्या मोठ्या सिटीत असावा. मुलाला स्वतःचा बंगला असावा. मुलामुलींच्या वयात जेमतेम फरक असावा. मुलगा फक्त श्रीफळ घेऊन लग्न करणारा असावा. मुलाच्या कुटुंबात माणसांची संख्या मोजकी असावी, अशा अपेक्षा मुळे मुलामुलींची लग्न जमण्यास व होण्यास विलंब होत आहे.
आईच्या हस्तक्षेप व अट्टाहासामुळे लग्न जमण्यास अडथळे!
डॉ. श्रीनिवास पवार पाटोदेकर- महिला तक्रार निवारण केंद्र तुळजापूरचे माजी सल्लागार
सध्या टीव्ही मालिका मोबाईल व इंटरनेटचा (Internet) वाढता वापर यामुळे कौटुबिंक संस्कृती (Culture) बिघडू लागली आहे. प्रत्येक कुटुंबात वडिलापेक्षा आईचेच महत्व वाढले आहे. मुलगी आणि आई जे ठरवेल तोच निर्णय घेण्याची आधुनिक पद्धत सुरु झाली आहे. आईच्या हस्तक्षेप व अट्टाहासामुळे लग्न जमण्यास अडथळे निर्माण होण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत, असे मत तुळजापूरच्या महिला तक्रार निवारण केंद्राचे माजी सल्लागार डॉ. श्रीनिवास पवार पाटोदेकर यांनी व्यक्त केले. मुलाच्या वडिलांना समाजातील खाच खळग्यांची जाण असते. शक्यतो मुलाच्या वडिलांना आपल्या मुलीचे कन्यादान करण्याची संधी द्या. मुलांची कुंडली तपासण्या पेक्षा त्याचे आरोग्य तपासा. त्याचे चारित्र्य तपासा. त्याचे संस्कार तपासा. मुलाच्या कर्तबगारीवर व त्याने केलेल्या संघर्षावर विश्वास ठेऊन योग्य वयात आपल्या मुलींची लग्न करा, असे आवाहन डॉ. श्रीनिवास पाटोदेकर यांनी केले.
नुसतेच बायोडाटे बघून वेळ वाया घालवू नका!
गेल्या 10 वर्षांपासून धाराशिव वधूवर सूचक व्हाट्सऍप ग्रुप चालवित आहे. धाराशिव कुणबी मराठा वधूवर सूचक या व्हाट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून विवाह इच्छुक मुलामुलींचे बायोडाटे (Biodata) पाठवित आहे. बायोडाटे पाहून लग्न (Marriage) जमविणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. बायोडाटे पाहण्यातच बहुतांश पालक वेळ घाया घालवताना दिसून येत आहे. प्रत्यक्ष संपर्क मात्र अत्यल्प होत आहेत. मुलाचा प्रामाणिकपणा, निर्व्यसनीपणा, कष्ट आणि संघर्ष, कौटुंबिक व सामाजिक संस्कार या नैतिक मुल्यांची (Moral Values) जपणूक करून वेळेत आपल्या मुलांमुलीचे संसार फुलविण्यासाठी पुढे या. केवळ बायोडाटे पाहण्यात वेळ वाया न घालवता आलेल्या स्थळांशी थेट संपर्क करा, असे आवाहन धाराशिव वधूवर सूचक ग्रुपचे एडमिन बालाजी पाटील केशेगांवकर यांनी केले आहे.