हिंगोली (Hingoli Ganeshotsav) : हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात यंदाचा गणेशोत्सव अतिशय उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. गणपती बाप्पांना ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता कयाधू नदीच्या तीरावर ढोल-लेझीमच्या गजरात भावपूर्ण निरोप देण्यात आला.
लेझीम ढोल पथकासह विसर्जन मिरवणूक आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.सकाळ पासूनच पोलीस ठाण्याच्या परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पारंपरिक गणवेशात पांढरे फेटे परिधान करून सज्ज झाले होते. लेझीम-ढोल पथकाच्या तालावर मिरवणुकीने परिसर दुमदुमून गेला. (Hingoli Ganeshotsav) विसर्जनानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिर – सामाजिक बांधिलकीची जाणीव
गणेशोत्सवाच्या (Hingoli Ganeshotsav) निमित्ताने हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व जपत विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्यात आले. या शिबिरात ५१ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.
गणेशोत्सवाच्या (Hingoli Ganeshotsav) दिवशी खास आरती आणि भक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सव दरम्यान दररोज सकाळी व संध्याकाळी आरती, भजन आणि सांघिक उपक्रमांमुळे पोलीस ठाण्यात भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळाले. ठाणेदार श्यामकुमार डोंगरे, पोलीस निरीक्षक राहुल घुले, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष वाठोरे यांच्यासह महिला पोलीस आणि सर्व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाळ-मृदंगाच्या गजरात श्रीगणेशाची आरती करण्यात आली. या गणेशोत्सवात हिंगोली ग्रामीण पोलिसांनी सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश दिला.
हिंगोली जिल्ह्यातील एकमेव ग्रामीण पोलीस ठाणे म्हणून, येथे साजऱ्या होणाऱ्या (Hingoli Ganeshotsav) गणेशोत्सवात जातीय सलोखा राखण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जातात. यंदाचाही उत्सव हा सामाजिक समरसतेचे प्रतीक ठरला.