Yawatmal :- यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ११३ पदांच्या पदभरतीला सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून (Textile Industry Department) ८ ऑक्टोबर रोजी दाखल तक्रारीनुसार तात्पुरती स्थगिती दिली होती. त्याविरुध्द जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर सुनावणीमध्ये याचिका कर्त्यांना पदभरती सुरु ठेवण्याची परवानगी दिली गेली. मात्र या रिट याचिकेचा निर्णय होईपर्यंत कोणतेही नियुक्ती आदेश जारी करणार नाहीत, असे आदेशित करण्यात आले आहे.
याचिकेचा अंतिम निर्णय होईपर्यंत नियुक्ती आदेश न देण्याचे निर्देश
याचिकाकर्त्यांकडून एॅड. घारे यांनी युक्तीवाद करताना म्हटले की मंत्र्यांना भरती प्रक्रिया थांबवण्याचा कोणताही अधिकार नसला तरी महाराष्ट्र राज्य (State of Maharashtra) यांनी भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त सचिवांनी ०८.१०.२०२५ रोजी जारी केलेल्या पत्रव्यवहाराकडे त्यांनी लक्ष वेधले. माननीय मंत्र्यांच्या निर्देशांशिवाय भरती प्रक्रिया थांबवण्याचे कोणतेही कारण या पत्रव्यवहारात नमूद केलेले नसल्याचेही म्हटले.
त्यानुसार निकाल देताना, स्पष्ट करण्यात आले की याचिकाकर्त्यांनी आधीच एक जाहिरात जारी केली आहे आणि भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार याचिकाकर्त्यांना भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याची परवानगी दिली गेली आहे.




