नवीन संगणक मान्यतेसाठी दहा हजाराची स्विकारली लाच
हिंगोली (ZP Education Department) : अनंत टाईपरायटींग अँन्ड शॉर्टहॅन्ड इंन्स्टिट्युटमध्ये संगणकाचे प्रशिक्षण देण्यासाठी व नवीन संगणक मान्यतेचा प्रस्ताव तपासण्यासाठी माध्यमिक शिक्षण अधिकार्यांचे पत्र तयार करून देण्याच्या मागणीसाठी लिपीक गजानन पळसकर याने १० हजार रुपयाची लाच स्विकारल्याने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने चतुर्भूज केले.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधिक्षक विकास घनवट यांनी दिलेली माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील खुडज येथील सर्वोदय विद्यालयातील सहशिक्षक गजानन पुंजाजी पळसकर हे हिंगोली जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयात वरिष्ठ लिपीक म्हणून प्रतिनियुक्तीवर कार्यरत असताना त्यांनी तक्रारदाराच्या नावे असलेल्या अनंत टाईपरायटींग अँन्ड शॉर्टहॅन्ड इंन्स्टिट्युटमध्ये संगणकाचे प्रशिक्षण देण्यासाठी व नवीन संगणक मान्यतेचा प्रस्ताव तपासण्यासाठी माध्यमिक शिक्षण अधिकार्यांचे पत्र तयार करून फाईल सादर करण्याकरीता १० हजार रुपयाच्या लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार १४ ऑक्टोंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात तक्रार दाराने केली होती.
त्याची पडताळणी केली असता गजानन पळसकर यांनी सदर कामासाठी १० हजार रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २१ ऑक्टोंबर रोजी जिल्हा परिषदेच्या आवारात दुपारी २ च्या सुमारास सापळा रचला असता लिपिक पळसकर यांनी १० हजार रुपयाची लाच स्विकारताच त्यांना पथकाने रंगेहात पकडले. सदर प्रकरणात लिपीक गजानन मुंजाजी पळसकर यांच्या विरूध्द हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागातील लिपिक गजानन पळसकर यांनी संगणकाचे प्रशिक्षण देण्यास व नवीन संगणक मान्यता प्रस्तावासाठी दहा हजाराची लाच घेतल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
जि.प.मध्ये उडाली खळबळ
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील लिपीक गजानन पळसकर यांनी २१ ऑक्टोंबर रोजी दहा हजार रूपयाची लाच जिल्हा परिषदेच्या आवारात दुपारी स्विकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. त्यामुळे जिल्हा परिषदे मध्ये एकच खळबळ उडाली आहे.




 
		
