मानवाने स्वतःच्या आरोग्यासाठी योग्य संतुलन राखले, तर आजार झाल्यावर उपचार करण्याची गरज पडणार नाही, त्यामुळे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपली दिनचर्या, खानपान, आहारविहार सोबतच निसर्गचक्र समजून घेत आपली ऋतूचर्या सुद्धा जाणून घेत तशी जीवनशैली स्वीकारली तरच मानव निरोगी जीवन जगू शकेल.
ज्या निसर्गाची आपण चर्चा करतो तो निसर्ग म्हणजेच पंचमहाभूत होय, पंचमहाभूतांचे वर्णन मुख्यतः आयुर्वेद व आध्यात्मशास्त्र ह्यात आढळून येते. विश्वातील सर्व घटक हे पंचमहाभूतांनीच बनलेले आहे, असे हे शास्रे म्हणतात. पंचमहाभूत म्हणजे अग्नी, वायू, आकाश, जल व पृथ्वी ही पाच तत्त्वे होय. आयुर्वेदात ह्यांचे वर्णन आरोग्याच्या संदर्भात आले आहे. आपले शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहे, असे आयुर्वेद म्हणतो. खरे तर निसर्ग समजून घेताना हे पंचमहाभूत समजून घेणे तितकेच गरजेचे आहे. आपल्या सभोवतालच्या निसर्गात जंगल, नदी, पर्वत, पशु-पक्षी, विविध प्रजाती, वृक्ष यांच्यातील जैवविविधतासुद्धा समजून घ्यावी लागेल. या सर्व घटकांचा आपल्या दैनंदिन जीवनावर व आरोग्यावरसुद्धा मोठा परिणाम होत असतो, तेव्हा निसर्गाचे संतुलन आणि मानवी आरोग्याचे संतुलन कसे राखले जाईल, याचा विचार मानवाने करणे गरजेचे आहे.
सर्वच सजीवांचे शरीर, अन्न, निसर्ग हे सारे पंचमहाभूतांनी तयार झालेले आहे. निसर्गाच्या प्रत्येक घटकाचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम आहे; मात्र मानव जसजसा प्रगती करीत, विकास करीत आहे तसतसा तो मानव आणि निसर्गाच्या चक्रामधील आपले संतुलन राखण्याचे कसब विसरत चालला आहे. अधिक भौतिक सुखाच्या आहारी जाताना आळस बळावत चालला आहे. आपले आरोग्य दीर्घकाळ टिकवायचे असेल, कायम निरोगी राहायचे असेल, ‘उपचारापेक्षा प्रतिबंध बरा’, असे वाटत असेल तर ह्या पंचतत्त्वांचा विचार नक्कीच ह्यायला हवा. पंचतत्त्व हे सर्वात लहान घटक असून निसर्गातील सजीव व निर्जीव अशा अनेक वस्तू बनवू शकतात. आजारी असलेल्या मनुष्याला आवश्यक औषधे, औषधी वनस्पती आणि सजीवासह सर्व काही घडविण्यास या मूलभूत घटकाचा समावेश असतो. प्रत्येक पदार्थामध्ये पंचतत्त्व असतात. यातील एक किंवा अधिक घटकांमध्ये संतुलन बिघडल्यास मानवाच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात आणि महत्त्वाचे असे की, या घटकांमध्ये संतुलन राखून यावर विजय मिळविता येतो, निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरणसुद्धा करता येते. या सर्व पंचमहाभूतांच्या घटकांमुळे प्रत्येक व्यक्तीची आचरण, प्रकृती भिन्न भिन्न असते, म्हणून मानवी आरोग्य ते निसर्गाचे आरोग्य सुद्धा अबाधित ठेवण्यास यात कायम संतुलन राखले गेले पाहिजे. म्हणून या पाचही घटकांविषयी प्रत्येक व्यक्तीने अधिक जाणून घेतले पाहिजे.
प्रथम घटक पृथ्वी: पंचमहाभूतात्मक संतुलन कसे आहे, यावर आपली प्रकृती ठरते. कुठल्याही सजीवाच्या शरीरात जे घन तत्त्व आहेत ते पृथ्वीपासून तयार होतात. जसे हाडे, पेशी इ. जेव्हा आपण पृथ्वीच्या घटकाचा विचार करतो, तेव्हा आपल्यामध्ये उडी मारणारे गुण म्हणजे स्थिरता, पोषण आणि संतुलन. दुसरा घटक जल: जलापासून द्रव तत्त्व जसे आहार, रस, रक्त इ. पाणी घटक हा प्रवाही, बरे करणारा, शांत. आणि पाण्याचा घटक जीवनातील सर्व द्रव आणि पोषणासाठी जबाबदार आहे. तिसरा घटक अग्नी: अग्निपासून उष्ण तत्त्व जसे, काही अन्न पचन करणारे इंद्रिय व घटक, अग्नी घटक हा ऊर्जा, उष्णता आणि शक्तीचा स्रोत, अग्नी घटक शुद्धीकरण आणि विषारी पदार्थ काढून टाकण्याशी संबंधित आहे. चौथा घटक वायू: वायू तत्त्वापासून सर्वप्रकारचे वायू जसे प्राणवायू, हवा घटक ऑक्सिजन प्रदान करते, जी जगण्यासाठी मूलभूत आणि सर्वात महत्त्वाची गरज आहे. ही एक महत्त्वाची ऊर्जा आहे जी आपल्या सभोवतालच्या सर्व सजीवांच्या जीवनाला चालना देते.
पाचवा घटक आकाश: आकाश तत्त्वापासून सर्वप्रकारच्या पोकळ्या जसे पोट, अन्ननलिका, आतडे इत्यादी अवयव बनतात. आकाश घटक हा इतर सर्व घटकांचा कंटेनर आहे. हे सर्वात सूक्ष्म आहे आणि ते इतर सर्व घटकांचे स्त्रोत असल्याचे मानले जाते.
या सर्व घटकांसोबत मानवाने स्वतःच्या आरोग्यासाठी योग्य संतुलन राखले, तर आजार झाल्यावर उपचार करण्याची गरज पडणार नाही, त्यामुळे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपली दिनचर्या, खानपान, आहारविहार सोबतच निसर्गचक्र समजून घेत आपली ऋतूचर्या सुद्धा जाणून घेत तशी जीवनशैली स्वीकारली तरच मानव निरोगी जीवन जगू शकेल. निसर्गाची आपली नाळ तुटू देऊ नये. निसर्गात म्हणजे जंगलातसुद्धा वन्यप्राणी आहेत, पशु-पक्षी आहेत त्यांनासुद्धा आजार होत असतील, तर ते निसर्गाला जवळ करतात; औषधाला किंवा डॉक्टरला नाही. ‘प्रिव्हेंशन इज बेटर डॅन क्युअर’ त्यांना समजत असावे, आपल्याला समजले पाहिजे.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आपल्या ग्रामगीतेत लिहितात-
प्रात:काळची आरोग्यदायी हवा।
सदासर्वदा मानवते जीवा।
प्रसन्नता देई ऋतू ते धवा।
सर्व प्राणीमात्रांसी।
सर्व वने- राने जागी होती।
पुष्पे सारी विकास पावती।
पशुपक्षीही नेहमी उठती। प्रातःकाळी।
बंडू धोतरे
९३७०३२०७४६
अध्यक्ष, इको-प्रो संस्था, चंद्रपूर