‘सांगा.. जवान राह्यले अन् म्हतारे इचीबीन दनादन लगन करून राह्यले.’
‘कोनं केलं लगन?’
‘सखाबुढ्यानं लगन केलं ना काल.. झोपीत आहेस काय तू?’
‘मी गावात नव्हतो.. आजच आलो.’
‘मंग काय पाह्यलं तुनं? आम्ही लगन लायाले गेलो.. पंगत झोडली.’
‘बुढ्याले कसा कंड आला या वयात?’
‘बुढी करोनात गेली ताहापासून बुढ्याचा झेंडू दाटून आला होता. बुढ्याले दोन पोरं आहेत.. सुना आहेत.. नातू आहेत.’
‘खायापियाची सोय असल्यावर बुढ्यानं काहाले रिकामे धंदे केले?’
‘बुढा म्हने एकट्याले झोप लागत नाही.. बुढी गेल्यापासून हुरहूर लागते. एकट्याले खोलीत कोंडून देलं.. कोनी बोलाले नाही. म्हतारपनी डोकसं दाबाले पाह्यजे कोनीतरी.. मंग आनली एक तिसरपनी धुंडून.. तेही पासटची आहे. बुढा पंचाहत्तर!’
‘सांगा.. या वयात काय होते दोर सळल्यावर?’
‘म्हतारपनी बोलाले सोबती पाह्यजे ना.. येरी दुसरं काय होते या वयात?’
‘लगन कुठी झालं?’
‘बुढ्याच्या घरापुढे मंडप टाकला. पंगत बुढ्यानंच देली. बुढी फक्त रिकामा झोरा घेऊन आली. पाचशे लोकं जेवले. बुंदी जिलबीची पंगत होती.’
‘लोकं हासले नाहीत काय?’
‘ लोकं धूम हासत.. बुढाही हासे.. नातू मस्त नाचले बुढ्याच्या लगनात. बँड होता. फटाके फुटले. बुढाही नाचला लगनात.’
‘ सांगा.. बुढ्यानं म्हतारपनी बायको आनली अन् मले जवान असून बायको नाही भेटून राह्यली.’
‘ तू फालतू आटून राह्यला.. जे भेटली ते हात करून घेतली पाह्यजे. बुढ्यानं तिसरपनी केली.. तेही फक्त बोलासाठी.’
‘आता काय बोलतीन ते म्हातारपणात?’
‘हा बुढा तिले जवानपनचे किस्से सांगत राहीन.. ते बुढी दोन नवर्याचं गुनगान करत राहीन.. कशीतरी रात काढनं आहे त्याहिले.. तू पाह्य मले अन् मी पाह्यतो तुले.’
‘बुढ्यापाशी लय पैसा आहे.. जाईन बुढीले घेऊन फिराले.. फुकट एसटी आहे बुढ्याले.’
‘आता बुढाबुढी कुठीबी गेले तरी पयसाले पानं तीनच आहेत. येरी दुसरं काय होते या वयात?
नरेंद्र इंगळे
९५६१२२६५७२