सुरुवातीला सहजसोप्या वाटणार्या लढतीने अचानक रंजक वळण घेतले आणि पुढे पुढे ती अधिकच संघर्षमय होऊ लागली. त्याचा परिणाम म्हणून एका बाजूने लढणार्या या लढतीच्या नायकाला आपला सगळा आत्मविश्वास, गुरुर गुंडाळून केवळ जनतेसमोरच नाही तर ईश्वरासमोरही माथा टेकायला भाग पाडले आहे. लोकशाहीची ही खरी ताकद म्हणावी लागेल. यापूर्वी देखील स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणार्या नेत्यांना जमिनीवर आणण्याचे काम या देशातील मतदारांनी केले आहे. मी म्हणजेच पक्ष, माझ्या जीवावरच पक्ष चालतो आहे, माझ्या जीवावरच पक्ष यशाची फळे चाखत आहे हा अहंकार पुष्ट झालेल्या नरेंद्र मोदींना आपला मी पणा शेवटी किती घातक ठरू शकतो याची कल्पना येऊ लागली आहे. यशाचे मानकरी इतर कुणी होऊच नये किंवा इतर कुणी कष्ट करीत असले तरी त्याला श्रेय मिळू नये यासाठी कायम धडपड करणार्या मोदींना कदाचित आपल्या चुकांची जाणीव आता होत असेल, परंतु आता किमान या निवडणुकी पुरती तरी वेळ निघून गेली आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी पायाला भिंगरी लागल्यागत संपूर्ण देशभर वणवण फिरताना दिसत आहेत. यावेळी पराभव झाला तर त्याचे अपश्रेय आपल्याच नावावर मांडले जाईल ही भीती त्यांना सतावत आहे.
कायम यशाची सवय असलेल्या आणि त्या अहंकारात कायम डुंबत असलेल्या व्यक्तीला अपयश पचविणे खूप कठीण जाते. हे अपयश आपल्या वाट्याला येऊ नये यासाठी मोदी केवळ मतदारांसमोरच नव्हे तर शक्य तिथे आपला माथा टेकवत असल्याचे दिसते. परवा मोदी बिहारच्या दौर्यावर होते. तिथे त्यांनी पाटणाच्या हर मंदिर साहेब गुरुद्वाराला भेट दिली. आपला माथा तिथे टेकवला, लंगरमध्ये भोजन घेतले. स्वतः पोळ्या लाटल्या आणि लंगरमध्ये जेवण वाढले देखील. जनतेला आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी मोदी असे कार्यक्रम नेहमीच करीत असतात. यावेळी अशा कार्यक्रमांमध्ये थोडी वाढ झालेली दिसते आणि त्यातून मोदींची अगतिकता अधिक प्रकर्षाने जाणवते. ही धडपड कदाचित त्यांना यश देऊन जाईलही, परंतु या केविलवाण्या धडपडीतून ते काही धडा शिकतील की नाही, याचे उत्तर येणारा काळच देईल. एक मात्र खरे की यावेळी विरोधी पक्षांनी नव्हे तर मोदींचा कारभार उघड्या डोळ्यांनी पाहणार्या सामान्य जनतेने नरेंद्र मोदींच्या अहंकारावर खोलवर वार केला आहे. त्याचा फायदा विरोधी पक्षांना होत असला तरी मुळात हे यश लोकशाहीतील सामान्य मतदारांचेच म्हणावे लागेल.