विचारधारा एक असेल तर एकत्र काम करणे किंवा एकत्र येणे फारसे कठीण नाही, अशा आशयाचे विधान शरद पवारांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात बर्याच प्रतिक्रिया उमटल्या. अगदी पंतप्रधान मोदींनीही वेगळा विचार करायचाच असेल तर देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी शरद पवार तसेच उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सहकार्यांप्रमाणेच भाजपसोबत यावे असे आवाहन केले. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही शरद पवारांच्या विधानाचे स्वागत केले. पृथ्वीराज चव्हाण सारख्या काही नेत्यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिल्या. या सगळ्याच्या दृष्टीने ही लोकसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. निवणुकीचे निकाल काहीही आले तरी निवडणुकीनंतर राजकीय क्षेत्रात मोठी घुसळण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस आघाडी सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत असेल तर आज काँग्रेसपासून दूर असलेले काही प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत सहकार्य करण्यास तयार होतील, कदाचित काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीनही होतील, परंतु काँग्रेस आघाडी सत्ता स्थापन करण्याइतपत जागा जिंकू शकली नाही तर हेच आज काठावर असलेले पक्ष भाजपच्या वळचणीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्यामागे शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे विचारधारा महत्त्वाची आहे असे म्हणणे तितकेसे योग्य ठरत नाही.
विचारधारा हा आधार इतकाच बळकट असता तर काँग्रेसची इतकी शकले झाली नसती. स्वत: शरद पवारांचा पक्ष गेल्या पंचविस वर्षांपासून काँग्रेससोबत आघाडीत आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या दोन्ही पक्षांची विचारधारा एकच आहे, असे असूनही शरद पवारांनी आपले वेगळे अस्तित्व कायम ठेवले, कारण विचारधारा हा सैद्धांतिकदृष्ट्या मांडण्यासाठी एक चांगला मुद्दा असला तरी राजकारणात सत्ता किंवा सत्तेतील वाटा हा घटक अधिक प्रभावी ठरतो. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची विचारधारा आणि भाजपची विचारधारा तशी एकच आहे, परंतु उद्धव ठाकरेंनी भाजपपासून फारकत घेतली ती त्यांची किंवा भाजपची विचारधारा बदलली म्हणून नाही तर हा निव्वळ सत्तेतील हिस्सेवाटीचा वाद होता. प.बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी गेल्या दशकभरात डाव्या पक्षांसह काँग्रेसचेही अस्तित्व संपुष्टात आणले. ममता बॅनर्जी काँग्रेसमध्येच होत्या आणि आजही त्यांची वेगळी अशी कोणतीच विचारधारा नाही, मूळ काँग्रेसच्या विचारधारेवरच त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे, परंतु त्यांनीही काँग्रेसपासून फारकत घेतलीच, अगदी या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेससोबत राजकीय तडजोड करण्यास नकार दिला. आज भाजपसोबत असलेले अनेक राजकीय पक्ष हे काही भाजपची राजकीय विचारधारा मान्य आहे म्हणून त्यांच्यासोबत नाहीत तर ती केवळ सत्ताकारणातील त्यांची एक गरज आहे म्हणून.
विचारधारा एक असेल तर एकत्र येणे किंवा एकत्र काम करणे सोईचे जाते, अशा परिस्थितीत काही वेगळा निर्णय घेतल्यास आपल्या समर्थक मतदारांना समजावणे सोपे जाते. उद्या शरद पवारांनी काँग्रेसमध्ये विलिन होण्याचा निर्णय घेतलाच तर त्यांच्या पक्षाच्या समर्थक मतदारांना फार मोठा धक्का वगैरे बसणार नाही, उलट विचारधारा एक असतानाही एकमेकांच्या विरोधात लढताना बरीच तार्किक कसरत करावी लागते. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले कारण भाजप विरोधी विचारधारेचे मतदान अनेक पक्षांमध्ये विभागले गेले. ही विभागणी टाळण्यासाठीच यावेळी भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येत एक आघाडी स्थापन केली. खरे तर विचारधारा एकच असेल तर या सगळ्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन होणे अपेक्षित होते, परंतु तसे होणार नाही. कदाचित काही पक्ष निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतीलही, परंतु त्यामागे केवळ विचारधारा हे एकच कारण नसेल राजकीय तडजोडीचा भाग त्यात मोठा असेल. सांगायचे तात्पर्य विचारधारा एक असणे या एका निकषावर राजकीय विचार होत नाहीत.
काँग्रेसमधून आजवर अनेक नेते बाहेर पडले, त्यापैकी काहींनी आपले स्वतंत्र पक्ष स्थापन करून काँग्रेससमोरच आव्हान उभे केले, त्यामागे एक मोठे कारण सत्तेत किंवा पक्षात योग्य मानसन्मान राखल्या गेला नाही हेदेखील होते. आसामचे विद्यमान मुख्यमंत्री एकेकाळी काँग्रेसचे दिग्गज नेते होते, परंतु शीर्षस्थ नेत्याने केलेल्या अपमानाने ते दुखावले आणि आज ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. अशाच छोट्या-मोठ्या कारणांमुळे विचारधारा एक असूनही अनेकांनी काँग्रेस सोडली. आता कदाचित सत्तेच्या आकर्षणातून ते पुन्हा काँग्रेसकडे परतू शकतील. थोडक्यात सांगायचे तर भारतीय राजकारणात विचारधारेपेक्षा संधी आणि सोय हे दोनच घटक महत्त्वाचे आहेत, कधी कधी ते विचारधारेच्या वेष्टणात झाकण्याचा प्रयत्न होतो एवढेच.