कोणत्याही लढाईला प्रत्यक्ष तोंड फुटण्यापूर्वी प्रतिपक्षाच्या आत्मविश्वासाला तडा देण्यात यश आले तर अर्धी लढाई तिथेच जिंकली जाते, असे म्हणतात. त्या पृष्ठभूमीवर विचार करायचा झाल्यास काही दिवसांपूर्वी सूरतमध्ये आणि आता इंदोरमध्ये जे काही घडले ते काँग्रेसची चिंता वाढविणारे म्हणावे लागेल. सूरतमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने दबावाखाली म्हणा किंवा आधीपासून शिजलेल्या राजकीय कटातून आपल्या उमेदवारी अर्जामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवली, परिणामी तिथे काँग्रेस उमेदवाराचा अर्जच फेटाळण्यात आला. त्यानंतर इतर उमेदवारांनीही आपले अर्ज मागे घेतल्यामुळे तिथे भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लढण्याची उर्मीच नाही, असा एक संदेश त्यातून गेला आणि त्याचे बरेवाईट परिणाम गुजरातमध्ये काँग्रेसला भोगावे लागतील. त्यानंतर आता मध्यप्रदेशातील इंदूरच्या काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी आपला अर्ज मागे घेत थेट भाजपमध्ये प्रवेश केला.
मध्यप्रदेशातही भाजप आणि काँग्रेसमध्येच थेट लढत होणार आहे, त्यामुळे इंदूर सारख्या शहरातून काँग्रेस उमेदवाराने माघार घेणे आणि केवळ माघार घेणेच नव्हे तर थेट भाजपमध्ये प्रवेश करणे काँग्रेससाठी चांगले संकेत म्हणता येणार नाही. त्याचा परिणाम इतर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांच्या मनोबलावर होऊ शकतो. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा निर्माण होऊ शकते. वास्तविक सूरत किंवा इंदूर या दोन्ही ठिकाणी भाजप अतिशय ताकदवान आहे आणि तिथे निवडणूक जिंकायला भाजपला फारसे कष्ट पडले नसते, परंतु या दोन्ही ठिकाणी काँग्रेस उमेदवाराला माघार घेण्यास भाग पाडून भाजपने काँग्रेसला मानसिक धक्का देण्याचे काम केले आहे. हा धक्का पचवून पुन्हा लढण्यासाठी सिद्ध होण्याचे आव्हान आता काँग्रेससमोर आहे. ही दोन्ही राज्ये सोबतच छत्तीसगढ, राजस्थान, उत्तरप्रदेश भाजपला मोठी आघाडी मिळवून देऊ शकतात. आपले हे बालेकिल्ले शाबूत ठेवण्यासाठी प्रतिपक्षाच्या आत्मविश्वासाला तडा देण्याची खेळी भाजपने खेळली आहे. कदाचित उत्तरप्रदेश आणि राजस्थानातही असे प्रकार होऊ शकतात. भाजपच्या या माईंड गेमला आता काँग्रेसकडून कसे प्रत्युत्तर दिले जाते, हे पाहावे लागेल.