Hinganghat :- अपत्यप्राप्तीच्या नावाखाली दाम्पत्याची तब्बल २१ लाख ८९ हजार रुपयांनी फसवणूक (Fraud) करण्यात आली. बैल घेऊन फिरणार्या व्यक्तीने अपत्य प्राप्तीकरिता पूजा करावी लागेल, असे सांगत फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी तक्रार करण्यात आली. तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
बैल घेऊन गावोगावी फिरणार्याने केली फसवणूक, हिंगणघाट पोलिसांत तक्रारीवरून गुन्हा दाखल
तालुक्यातील गोवींदपूर वाघोली येथील फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बैल घेऊन फिरणारा आणि त्याच्या साथीदाराने दाम्पत्याची २१ लाख ८९ हजार रुपयांनी फसवणूक केली. माहितीनुसार, फिर्यादी गोविंदपुर वाघोली येथे शेती करतात. पाच वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर त्यांना अपत्य नाही. त्याकरिता त्यांनी उपचार घेतले. याच दरम्यान गोविंदपुर गावात २५ जून रोजी नंदीबैल घेऊन एक व्यक्ती तसेच त्याचा साथीदार आला. हे दोन्ही व्यक्ती फिर्यादीच्या घरी पोहोचल्यावर तेथे उपस्थित फिर्यादीच्या पत्नीला पिण्याकरिता पाणी मागिततले. तेव्हा फिर्यादीच्या पत्नीने लग्न होऊन पाच वर्षे झाले असताना अपत्य नसल्याचे सांगितले. नेमके हेच कारण समजून नंदीबैल मालकाने फिर्यादीच्या पत्नीस तुम्हाला मुल होऊ शकते, त्यासाठी पूजा करावी लागते, असे सांगितले. पूजा करण्याच्या नावाने २५ जूनपासून २ ऑगस्टपर्यंतच्या दरम्यान २१ लाख ८९ हजार रुपये उकळले. घरी सोन्याचा हंडा आहे, तुम्हाला काही कमी नाही असे आमिष दाखविले.
शेत जमिन विक्रीतून आलेल्या पैशांसह जवळचे पैसे त्यांनी दिले. २ ऑगस्ट रोजी फिर्यादीस त्यांची फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. दोघांनी आणखी ३६ लाख रुपयांची मागणी केली. फसवणूक करणार्यांनी फिर्यादीच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी (police)दोन जणांविरोधात कलम ३१८ (आहे ४)३०८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.