उपाययोजना राबविण्यासाठी निधी खर्च करण्याचे आदेश
गडचिरोली (Disaster Management Authority) : येत्या पावसाळयाच्या कालावधीत विविध उपाययोजना राबविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास ५० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या तरतुदीनुसार मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. आपत्तीप्रसंगी प्रतिसाद देणार्या यंत्रणांचे सक्षमीकरण करणे ही प्राधिकरणाची मुख्य जबाबदारी आहे.
आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आपत्तीमुळे निर्माण होणारे धोके व नुकसान कमी करण्याकरिता उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना, सौम्यीकरण उपाय, पूर्वतयारी व क्षमता बांधणी, प्रशिक्षण व जनजागृती, शोध व बचाव कार्य, आपत्ती व्यवस्थापना संबंधित साहित्य खरेदी, दुरुस्ती या करिता राज्यातील जिल्ह्यांना निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या कलम ३१ प्रमाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन त्यानुषंगाने आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आपत्तीमुळे निर्माण होणारे धोके व नुकसान कमी करण्याकरिता उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना, सौम्यीकरण उपाय, पूर्वतयारी व क्षमता बांधणी, प्रशिक्षण व जनजागृती, शोथ व बचाव कार्य, आपत्ती व्यवस्थापना संबंधित साहित्य खरेदी ,दुरुस्ती या करिता ५० लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. सदर निधी करीता जिल्हाधिकारी यांना नियंत्रक अधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.