पांढरकवडा (Yawatmal) :- मंत्रालयातील विविध विभागात अनुसुचित जमातीसाठी राखीव असलेल्या पदांपैकी अवर सचिव, कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी, लिपीक टंकलेखक, उच्च श्रेणी टंकलेखक, लघु टंकलेखक अशा ५० जागेवर भरती करण्यात आली आहे. या भरतीची कुठेही जाहिरात करण्यात आली नसुन गैरमार्गाने हि भरती प्रक्रीया राबविण्यात आल्याचा आरोप ट्रायबल फोरमचे (Tribal Forum) जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम यांनी केला आहे.
भरतीची कुठेही जाहिरात करण्यात आली नसुन गैरमार्गाने हि भरती प्रक्रीया राबविण्यात आल्याचा आरोप
२१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार मंत्रालयातील विविध विभागात बिगर आदिवासींनी बळकावलेली अनुसुचित जमातींची राखीव पदे रिक्त करण्यात आली होती. या राखीव पदांवर कार्यरत असलेल्या बिगर आदिवासींना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आल्यामुळे ५० पद रिक्त असल्याची माहिती खुद्द मंत्रालयाने २८ नोव्हेंबर २०२४ रोजी माहिती अधिकारातुन ट्रायबल फोरमचे राज्य संघटक अरविंद वळवी यांना दिली होती. मात्र अवघ्या सहा महिण्यातच मंत्रालयातील विविध विभागामध्ये ती रिक्त असलेली आदिवासींची ५० पदे भरण्यात आल्याची माहिती पुन्हा माहिती अधिकारतुन पुढे आली आहे. वरील पदे भरण्यात आल्याची माहिती ७ एप्रिल २०२५ रोजी सामान्य प्रशासन विभागाच्या जन माहिती अधिकारी अक्षता देसाई यांनी दिली आहे. या माहितीमध्ये त्या ५० राखीव पदांवर अनुसुचित जमातीच्या भरती केलेल्या उमेदवारांची माहितीही मागण्यात आली. मात्र ती माहिती देण्यात येत नसल्याचे नैताम यांनी आपल्या निवेदनातुन स्पष्ट केले आहे.
अनुसुचित जमाती पदभरतीचा तपशील नोव्हेंबर २०२४ मध्ये रिक्त दाखविण्यात आला होता
अनुसुचित जमातीच्या उमेदवारांची माहिती या कार्यासनाकडे संकलीत स्वरुपात उपलब्ध नाही. असे मंत्रालयाकडुन कळविण्यात आले आहे. माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार जी माहिती प्राप्त झाली त्यानुसार मंत्रालयातील अनुसुचित जमाती पदभरतीचा तपशील नोव्हेंबर २०२४ मध्ये रिक्त दाखविण्यात आला होता. आणी त्यानंतर लगेचच सहा महिण्यात दुसरा माहिती अधिकार अर्ज टाकल्यानंतर त्या त्या वेळी ५० पदे भरण्यात आल्याचे सांगितल्या जात आहे. हि भरती म्हणजे आदिवासी समाज बांधवांची चक्क फसवणुक करणारी आहे. या पदभरतीची कुठेही जाहिरात न करताच पदे भरण्यात आल्याने यामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप अंकित नैताम यांनी आपल्या निवेदनातुन केला आहे.