६३ लाखांचा मुद्देमाल स्फोट करून नष्ट!
नांदेड (Illegal Sand Mining) : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडच्या महसूल प्रशासनाने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. तालुक्यातील विष्णूपुरी परिसरात उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २९ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता केलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
अवैध उत्खनन सहन केले जाणार नाही- तहसिलदार संजय वारकड यांचा इशारा!
महसूल पथक (Revenue Squad) विष्णूपुरी परिसरात गस्त घालत असताना, त्यांना वाळू उत्खनन करणारे २ मोठ्या बोटी, १ छोटी बोट आणि ४ इंजिन आढळून आले. विशेष म्हणजे, पथकाने मजुरांच्या साहाय्याने या ३ बोटी आणि ४ इंजिन जिलेटीनचा वापर करून स्फोट करत जागेवरच नष्ट केले. याव्यतिरिक्त, वाळू वाहतुकीसाठी वापरले जाणारे ३० तराफे जाळून टाकण्यात आले. या कारवाईत सुमारे ६३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला.सदर कारवाईउपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ , तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार, मंडळ अधिकारी कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, मोहसीन सय्यद,ग्राम महसूल अधिकारी मनोज जाधव, माधव भिसे, बरोडा, श्रीरामे , जमदाडे, मनोज सरपे,महेश जोशी, महसूल सेवक बालाजी सोनटक्के,शिवा तेलंगे आदीने केली आहे.
महसूलच्या या धडक कारवाईमुळे, जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले!
सदर कारवाईसाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक उपलब्ध करून दिले, ज्यामुळे ही मोठी कारवाई यशस्वीपणे पार पडली. उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आणि तहसीलदार संजय वारकड यांनी अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांना सक्त इशारा दिला आहे की, नांदेड महसूल प्रशासन यापुढेही सक्तीने आणि कठोर कारवाई करत राहील. महसूलच्या या धडक कारवाईमुळे, जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
हायवा ट्रक जप्त, फौजदारी कारवाईची तयारी!
याचबरोबर, पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा एक हायवा ट्रक (MH26BC4892) जप्त करून तो नांदेड तहसील कार्यालयाच्या परिसरात आणला आहे. या हायवावर दंडात्मक तसेच फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.




