परभणी (Parbhani) :- नवीन ट्रान्सफार्मर (Transformer) बसवुन देण्यासाठी ३ हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणत लाचेची मागणी करत रक्कम स्विकारणार्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ११ फेब्रुवारी रोजी केली. सदर प्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime)दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
लोकसेवकाविरुध्द पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु
३८ वर्षीय तक्रारदाराने तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांच्या पाथरी तालुक्यातील झरी कालव्याजवळ असलेल्या शेतातील विद्युत मोटारीसाठी (Electric motor) नवीन ट्रान्सफार्मर बसवुन देण्याकरीता महावितरण उपविभाग कार्यालय पाथरी ग्रामीण शाखा – १ येथील वरिष्ठ तंत्रज्ञ ज्ञानोबा नारायणराव पितळे यांनी लाचेची मागणी केली. याबाबत परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार देण्यात आली. तक्रारीची ११ फेब्रुवारीला पडताळणी करण्यात आली. आरोपी लोकसेवकाने पंचासमक्ष तुमच्या मनाने काय द्यायचे ते द्या असे म्हणत लाचेची मागणी करुन लाच रक्कम स्विकारण्यास सहमती दिली. सिमुरगव्हाण फाटा येथील मोहिनी टि हाऊस येथे पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून ३ हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लोकसेवकाला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता लाचेची ३ हजार रुपये रक्कम व इतर ८ हजार रुपये मिळून आले. संबधीत लोकसेवकाविरुध्द पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ही कारवाई पोलिस उपअधिक्षक अशोक इप्पर, पो.नि. बसवेश्वर जकीकोरे, पो.नि. अलताफ मुलानी, सपोउपनि. निलपत्रेवार, पोलिस अंमलदार शेख जिब्राईल, कल्याण नागरगोजे, नामदेव आदमे, जे.जे. कदम, नरवाडे यांच्या पथकाने केली.




