हिंगोली(Hingoli) :- शहरातील नगर पालिका, आरोग्य विभाग व पोलीस यानी संयुक्त पथक तयार करून तंबाखू जन्य पदार्थ व अंमली पदार्थाला प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबवून कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या.
अंमली पदार्थाला प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबवून कार्यवाही
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक दि. 26 नोव्हेंबर घेण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, समाज कल्याणचे ए. एम. वागतकर, स्थानिक गुन्हे शाखेचे (Local Crime Branch) पोलीस निरीक्षक विकास पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मोहन मातकर, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ. बालाजी भाकरे, डॉ. निशांत मानका, अन्न व औषध प्रशासन विभागाचे मनोज पैठणे, वन विभागाचे सचिन माने उपस्थित होते.
कार्यवाही करण्यासाठी पोलीस विभागाने विशेष मोहीम राबवावी
जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी जिल्हा रुग्णालयांच्या (District Hospitals) तंबाखू नियंत्रण पथकाने पोलिसांचे सहकार्य घेऊन शाळा, विद्यालय, महाविद्यालय, रुग्णालयासमोर पानशॉपीवर गुटखा विक्री होत असल्यास त्यांच्यावर कोटपा कायद्यानुसार कार्यवाही करावी. अन्न व औषध प्रशासन विभागाने मेडीकल स्टोअर्सवर अंमली पदार्थ किंवा नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास त्या ठिकणी डमी ग्राहक पाठवून कार्यवाही करण्यात यावी. सर्व सदस्यांनी आपापल्या कार्य क्षेत्रातील परिसरात गांजा, अंमली पदार्थ (N.D.P.S.) सदराखालील गुन्हे घडणार नाहीत याबाबत सर्वांनी लक्ष ठेवावे आणि तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला माहिती कळवावी. जिल्ह्यातील गांजा, अंमली पदार्थ (एन.डी.पी.एस.) संबंधाने जास्तीत जास्त कार्यवाही करण्यासाठी पोलीस विभागाने विशेष मोहीम राबवावी.
गावातील माहिती न देणाऱ्या पोलीस पाटलांवर कार्यवाही करावी
तसेच ज्या गांजाची कार्यवाही झाली आहे, अशा गावातील माहिती न देणाऱ्या पोलीस पाटलांवर कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यात गांजा वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच तात्काळ गुन्हे दाखल केले आहेत. विधानसभा निवडणूक (Assembly Elections) आचारसंहिता काळात औंढा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे आसोला शिवारातील शेत गट क्र 260 मध्ये 10 गांजाची झाडे व आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील बोल्डावाडी शिवारातील शेत गट क्र 58 मध्ये 139 गांजाची झाडे मिळून आले आहेत. या दोन्ही गुन्ह्यात 149 लहान, मोठे गांजाची झाडे वजन 29.72 कि.ग्रॉम मिळून आली आहेत. याबाबत कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती दिली.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे मनोज पैठणे यानी मेडीकल स्टोअर्स तपासणीत कोठेही अंमली पदार्थ किंवा नशेची औषध मिळून आली नसल्याने कार्यवाही केली नाही. तसेच वसमत येथील एम.आय.डि.सी. मध्ये असलेली भुमीन्युट्रोसिटी कंपनीमध्ये नियमानुसार केमिकल वापरल्याने कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याची माहिती दिली.