Gadchiroli :- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी परीसरात दररोज अपघात होऊन कित्येक जण मृत्यूमुखी पडतात तर कित्येक जण गंभीर जखमी होतात. या जखमींना आष्टी ग्रामीण रूग्णालयात हलविले जाते. मात्र या ठिकाणी अपघातग्रस्तासाठी पुरेशी सुविधा नसल्याने रेफर टु चंद्रपूर,गडचिरोली असा प्रकार चालतो. यादरम्यान कित्येकांना आपले जिव गमवावे लागत असल्याने आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात ट्रामा केअर उभारण्याची मागणी होत आहे.
आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात अपघातग्रस्तांसाठी सुविधांचा अभाव
आष्टी गावात ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती १५ डिसेंबर २००६ ला करण्यात आली. या रुग्णालयांमध्ये ३० बेडची मंजुरी देण्यात आली होती. आज ग्रामीण रुग्णालयास १८ वर्षे पूर्ण झाले आहेत. आष्टी -चंद्रपूर, आष्टी- अहेरी, आष्टी- गडचिरोली, आष्टी -मुलचेरा ,आष्टी -आलापल्ली ,आष्टी -चामोर्शी या महामार्गावर मोठया प्रमाणात अपघात होत असल्याने आष्टीचे ग्रामीण रुग्णालय अपघात ग्रस्तांना सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरत आहे. आष्टी ग्रामीण रुग्णालयात (Rural hospitals) कित्येक वर्षापासून १०८ क्रमांकाची अॅम्बुलन्स सुविधा नाही. आष्टीच्या आजूबाजूतील गावातील नागरिकांचे भरपूर ठिकाणी अपघात होत असतात. त्या अपघातामध्ये जखमी झालेल्यां रुग्णांना चंद्रपूर किंवा गडचिरोली येथे रेफर करण्यात येते. त्यामुळे रेफर होणार्या रुग्णांना गडचिरोली, चंद्रपूर येथे नेण्याकरिता एकतर खाजगी वाहनाचा सहारा घ्यावा लागत आहे नाहीतर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहीकेस बाहेरून बोलवावे लागत आहे.
वेळेवर वाहन न मिळाल्यास प्रसंगी रुग्णही दगावत असतात. यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister) तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Guardian Minister Devendra Fadnavis) तसेच सह पालकमंत्री आशिष जयस्वाल व आरोग्य मंत्री तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक,वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन आष्टी ग्रामीण रुग्णालयातील समस्या निकाली काढाव्यात अशी मागणी होत आहे. तसेच आष्टी येथे ट्रामा केअर सेंटर (Trauma Care Center) उभारण्यात यावे अशी मागणी नागरिकाकडून जोर धरत आहे.