१२ संचालकांच्या स्वाक्षर्या!
परभणी (Agricultural Produce Market Committee) : परभणीतील पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती अनिलराव नखाते यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला असून, या ठरावावर १२ संचालकांच्या स्वाक्षर्या आहेत. तेरावे संचालक राजस्थान येथे वास्तव्यास असल्याने त्यांच्या स्वाक्षरीचा अभाव असला तरी, त्यांनीही ठरावाच्या बाजूने भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
ठरावानंतर संचालक सहलीवर रवाना?
हा अविश्वास ठराव शुक्रवार ३१ ऑक्टोबर रोजी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला. सदर ठराव महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम २३ (अ) नुसार दाखल करण्यात आला आहे. अविश्वास ठरावात सभापती अनिलराव नखाते यांच्यावर मनमानी पद्धतीने कामकाज केल्याचा, बाजार समितीच्या हिताच्या निर्णयांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि स्वतःच्या कुटुंबीयांना योजनांचे लाभ मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठरावात नमूद करण्यात आले आहे की, सभापतींनी संचालकांचा विश्वास गमावला असून, बैठकीत संचालकांचा सल्ला न घेता आर्थिक विषयांवर निर्णय घेतले जात आहेत. यातील विशेष बाब म्हणजे, अविश्वास ठरावावर सही करणार्या संचालकांपैकी अर्ध्याहून अधिक संचालक माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या गटातील आहेत, तर दुर्राणी यांचे कट्टर राजकीय विरोधक शिवसेना (शिंदे गट) नेते सईद खान यांच्या गटातील काही संचालकांनीही या ठरावाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात या घडामोडीमुळे मोठी खळबळ माजली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ठराव सादर करताना माजी आ. बाबाजानी दुर्राणी स्वतः उपस्थित होते, हे विशेष मानले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सईद खान यांना या ठरावाबाबत कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. त्यांच्या गटातील संचालकांनी त्यांना विश्वासात न घेता ठरावावर स्वाक्षर्या केल्याचे समजते. दरम्यान, अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर सर्व संचालक सहलीसाठी रवाना झाल्याची माहिती मिळत असून, यामुळे या राजकीय हालचालींना आणखी रंग चढला आहे.
ठरावावर खालील संचालकांच्या स्वाक्षर्या!
एकनाथ रामचंद्र घांडगे,टाकळकर किरण भागिरथराव, संतोष जगन्नाथ गलबे, संजीव मारोतराव सत्वधर, गणेश सखाराम दुगाणे,शेख दस्तगीर शेख हसन,शाम उत्तमराव धर्मे,विजयकुमार तुळशिराम शिताफळे, अशोक उत्तमराव आरबाड,टेंगसे संदिप शिवाजीराव,आनंद लक्ष्मणराव धनले, स. गालेब स.इस्माईल तर ठरावावरील तेरावे संचालक अमोल ओमप्रकाश बांगड हे खाजगी कामानिमित्त परराज्यात असल्याने त्यांची स्वाक्षरी ठरावावर नाही.




 
			 
		

