परभणी/पाथरी (Parbhani) :- शासनाचे महत्त्वकांक्षी ॲग्रीस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्राम पातळीवर पथके स्थापन केली असताना आता ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्यानंतर महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध कारणे देत ॲग्रीस्टॅक योजनेवर (Agri stack scheme) बहिष्कार टाकला असल्याचे जिल्हाधिकारी यांना एका निवेदनातून कळवले आहे .
अत्यावश्यक सोयसुविधा उपलब्ध नाहीत
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना शुक्रवार २० डिसेंबर रोजी महसूल कर्मचाऱ्यांची संघटना असणाऱ्या महाराष्ट्र राज्य तलाठी संघ यांच्या वतीने एक निवेदन देण्यात आले असून यामध्ये म्हटले आहे की ,
कृषी विभागाच्या ॲग्रीस्टॅक या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्राम पातळीवर ग्राम महसुल अधिकारी, कृषी सहाय्यक व ग्राम पंचायत अधिकारी यांचे संयुक्त पथक निर्मिती करुन कामकाज करण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे. कृषीसहाय्यक व ग्राम पंचायत अधिकारी यांच्यावर शिबीराचे आयोजन, आवश्यक भौतीक सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी व तसेच योजनेचा प्रचार व प्रसिध्दी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु कृषी सहाय्यक व ग्राम पंचायत अधिकारी संघटनेचे सदर कामावर बहिष्कार टाकला असुन काम न करण्याबाबत शासनाला निवेदन दिले असल्याचे निर्दशनास आणून देत
अॅग्रीस्टॅक हि योजना उच्चतंत्रज्ञान आधारीत असल्याकारणाने त्याची अंमलबजावणी ग्राम पातळीवर राबवण्यासाठी सर्व ग्राम महसुल अधिकारी व मंडळ अधिकारी यांचे लॅपटॉप व प्रिंटर कालबाह्य होऊन ६ वर्ष उलटले आहेत असल्याचेही म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
सोबतच नविन ग्राम महसुल अधिकारी यांना अद्याप नविन लॅपटॉप (Laptop)व प्रिंटर(Printers) मिळाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. ग्राम पातळीवर अॅग्रीस्टॅक योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांचे स्पष्ट स्वरुपात आदेशीत केलेले असताना सुध्दा महसुल सेवक यांना अद्याप सज्जावर कार्यरत केलेले नाही म्हणत मंडळ अधिकारी व ग्राम महसुल अधिकारी यांचे कालबद्ध पदोन्नती , विभागीय चौकशी तसेच सेवा जेष्ठता यादी अद्याप पर्यंत प्रसिध्द करण्यात आलेली नसुन याबाबत सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसुल अधिकारी यांच्यात असंतोषाची भावना निर्माण होत आहे असल्याचे म्हटले आहे .