केसेसचे दस्तऐवज परत करण्यासाठी आरोपींनी मागितली ५० हजाराची खंडणी
चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयातील घटनेने सर्वत्र खळबळ
चंद्रपूर (Chandrapur District Court) : एरवी घरफोड्या, वाहन चोरी, वाहनातील रक्कम चोरी अथवा सोनसाखळीचोरीच्या घटना सर्वसामान्य झालेल्या असताना चोरट्याने चक्क थेट जिल्हा सत्र न्यायालयातच हात साफ केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरच्या जिल्हा सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे घडली आहे.
विशेष म्हणजे या चोरट्यांनी न्यायालयातून काही महत्त्वाच्या खटल्याच्या केसेस चोरून त्या पुन्हा परत करण्यासाठी लिपिकाला ५० हजाराची खंडणी मागितली, त्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्राप्त माहितीनुसार चोरी केलेल्या केसेस मध्ये फौजदारी अपील क्रमांक. ३/२५ रामराज विरुद्ध सरकार, विशेष पोस्को केस.नं. १९३/२५ सरकार विरुद्ध विनय, दिवाणी अपील क्रमांक. ३१/२४ सुषमा विरुद्ध विनोद, नियमित दिवाणी मूकदमा नं.२१६/५ सुषमा विरुद्ध विनोद या चार केसेसचा समावेश आहे.
न्यायालयात कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक सतीश उगले यांच्या ताब्यात असलेली केस क्रमांक ३/२५ ही गहाळ झाली. केस गहाळ झाल्याचे निदर्शनास येताच न्यायालय प्रशासनाने लिपिक उगले यांना विभागीय चौकशीसाठी नोटीस बजावली. उगले यांना ज्या दिवशी नोटीस मिळाली. त्याच दिवशी प्रदीप लांडगे, राहणार विसापूर याने उगले यांना फोन करून सांगितले की, जी केस गहाळ झालेली आहे ती केस हवी असल्यास ५० हजार रुपये देण्याची मागणी केली. प्रदीप लांडगे हा बाह्य यंत्रणेमार्फत जिल्हा न्यायालय या कंत्राटी पद्धतीने डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कामावर होता. गहाळ झालेली केस मिळविण्यासाठी खंडणीची मागणी झाल्याने १० ऑगस्ट २०२६ रोजी लिपिक सतीश उगले आणि खंडणी मागणारा डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रदीप लांडगे यांची चंद्रपुरातील हॉटेल पॅलेस मध्ये बैठक झाली.
यावेळी एक साक्षदारही तेथे उपस्थित होता. हॉटेलमध्ये झालेल्या चर्चेनंतर लिपिक सतीश उगले यांनी प्रदीप लांडगे याला २५ हजार रुपये नगदी दिले व केस परत मागितली. त्यावेळी प्रदीप लांडगे याने केस दुचाकी च्या डिक्कीत आहे असे सांगून केवळ खटल्याचे कागदपत्र दाखवली. मात्र केस परत केली नाही उर्वरित २५,००० रूपये दिल्यानंतर केस परत दिली जाईल असे सांगत प्रदिप लांडगे तेथून ऑटोनी निघून गेला. त्यानंतर लिपिक सतीश उगले यांनी सदर घटनेबाबत रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपास करून आरोपी प्रदीप लांडगे याला अटक केली आहे. आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ३०८(२) आणि ३१६ (४) अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.