‘सहकार’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘विश्वास’ हा आहे : राधेश्याम चांडक; ठेवीदारांच्या हितासाठी पतसंस्थांच्या व्याजदरांवर स्पष्ट निर्बंधांची गरज
चिखली : येथील रेणुकामाता नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन आणि स्थलांतर सोहळा रविवार, १३ सप्टेंबर रोजी रायली जिन गेट येथील नवीन कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पारदर्शक कारभार आणि सभासदांचा विश्वास या बळावर ३३ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करणाऱ्या संस्थेने आता स्वतःच्या नूतन वास्तूत प्रवेश केला आहे. या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे उद्घाटन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मा. सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते झाले. बुलडाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राधेश्यामजी चांडक यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. मा. श्री. विद्याधरजी महाले साहेब हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. प्रेमराजजी भाला, नगराध्यक्ष मा. श्री. पंडीतरावजी देशमुख, मा. ॲड. विजयजी कोठारी, मा. श्री. रामकृष्णदादा शेटे, मा. श्री. सतीशजी गुप्त, मा. श्री. राजेंद्र घोंगे, मा. सौ. वैशालीताई खेडकर, मीनलताई गावंडे आणि डॉ. दीपक लद्दड यांची विशेष उपस्थिती होती.
‘३३ वर्षांची वाटचाल संघर्ष, मेहनत आणि विश्वासामुळे’
उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार श्वेताताई महाले यांनी रेणुकामाता पतसंस्थेच्या प्रगतीचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “रेणुकामाता पतसंस्थेने अतिशय संघर्षातून आपली ३३ वर्षे पूर्ण केली आहेत. पारदर्शक कारभार, मेहनत आणि सभासदांचा विश्वास यामुळेच आज संस्थेचे स्वतःच्या भव्य वास्तूत स्थलांतर होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.”
चिखलीच्या बदलत्या ओळखीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “चिखली शहर हे आजवर सांस्कृतिक आणि राजकीय शहर म्हणून ओळखले जात होते; मात्र आता ते ‘सहकाराची पंढरी’ किंवा ‘पतसंस्थांचे माहेरघर’ म्हणूनही नावारूपास येत आहे. निवडणुकीच्या वेळी वेगवेगळे असणारे नेते आणि जुने परिवार आता सहकाराच्या माध्यमातून एकत्र येत आहेत, ही शहराच्या विकासासाठी अतिशय सकारात्मक बाब आहे.”
‘सहकाराचा पाया विश्वासावरच’
कार्यक्रमाचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी सहकार क्षेत्रातील सद्यस्थितीवर परखड भाष्य केले. ते म्हणाले, “सध्या अनेक पतसंस्थांमध्ये व्याज आणि एजंट्सना कमिशन देण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. ही ठेवीदारांच्या कष्टाच्या पैशांसाठी अत्यंत धोक्याची आहे. ‘सहकार’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘विश्वास’ हा आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे चारित्र्य तसेच आर्थिक व्यवहार स्वच्छ असतील, तरच लोकांचा संस्थेवर खऱ्या अर्थाने विश्वास बसतो.”
ठेवीदारांची फसवणूक टाळण्यासाठी शासनाने पतसंस्थांच्या व्याजदरांवर स्पष्ट निर्बंध आणणे आवश्यक असल्याचे मतही चांडक यांनी व्यक्त केले.
ग्रामीण विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी सांगितले की, “खेड्यांमधून शहरांकडे होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी आणि गावातच रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकारने नवीन धोरण आणले आहे. या धोरणांतर्गत विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत गावातच पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, रेशन दुकान अशा अनेक प्रकारच्या सुविधा आणि गोडाऊन उभारण्यासाठी प्रत्येक संस्थेला आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे.”
शहरातील पतसंस्थांनी बंद पडलेल्या किंवा डबघाईला आलेल्या ग्राम विकास संस्था दत्तक घेऊन त्यांचे पुनरुज्जीवन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘३३ वर्षांपूर्वीचे रोपटे आज वटवृक्ष’
मुख्य अतिथी विद्याधर महाले यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडला. ते म्हणाले, “रेणुकामाता पतसंस्थेचे ३३ वर्षांपूर्वी लावलेले रोपटे आज एका विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाला मोठी चालना मिळू शकते. यासाठी आता पतसंस्थांनी अधिक ताकदीने पुढे येण्याची गरज आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक राजेश कोठारी यांनी केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष तथा संचालक प्रा. नरेंद्र खेडेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सामाजिक कृतज्ञतेतून विविध मान्यवरांचा सन्मान
स्थलांतर सोहळ्याच्या निमित्ताने संस्थेने सामाजिक कृतज्ञता व्यक्त केली. अपंग विद्यार्थी, शहीद जवानांच्या वीरपत्नी तसेच देशसेवेसाठी सैन्यदलात आपली अपत्ये पाठविणाऱ्या मातांचा व त्यांच्या पुत्रांचा विशेष सत्कार करण्यात आला.
याशिवाय शहरातील तीनही हिंदू स्मशानभूमींच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार घेणाऱ्या विविध पतसंस्थांच्या अध्यक्षांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये जुनागाव स्मशानभूमीसाठी श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पंडितदादा देशमुख, हिंदू स्मशानभूमीसाठी धनश्री अर्बनचे अध्यक्ष अजय कोठारी, तर राऊतवाडी स्मशानभूमीसाठी प्रा. निलेश गावंडे यांचा सत्कार करण्यात आला.
संचालक मंडळासह सभासदांची मोठी उपस्थिती
या दिमाखदार सोहळ्याला संस्थेच्या अध्यक्षा सौ. ज्योती प्रेमराज भाला, उपाध्यक्ष मनोज नगरिया, कार्यकारी संचालक राजेश कोठारी, संस्थापक अध्यक्ष तथा संचालक प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य निलेश अंजनकर, निलेश कोठारी, विजय व्यास, अमोल उरसाल, सौ. रेवती भवर, सौ. पूनम बैरागी, उदय तोष्णीवाल, गिरीष बाहेती, तज्ञ संचालक मकरंद जोशी आणि व्यवस्थापक प्रशांत डुकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन निलेश अंजनकर यांनी केले. सोहळ्याला संस्थेचे सर्व संचालक मंडळ, सभासद, भागधारक, ठेवीदार आणि परिसरातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.