रामकुंडावर गोदापूजन आणि धार्मिक विधींनंतर सोहळा; 1 नोव्हेंबरला शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते यज्ञाची पूर्णाहुती, यंदाचा सिंहस्थ तब्बल 21 महिन्यांचा
नाशिक : गोदावरीच्या पवित्र तीरावर नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वाला ऐतिहासिक प्रारंभ झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत रामकुंड परिसरात रविवारी दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी भव्य धर्मध्वजारोहण सोहळा पार पडला. नाशिकच्या इतिहासात कुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहणासाठी राष्ट्रपती उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. त्यामुळे या सोहळ्याला विशेष ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी रामकुंड परिसरात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी गोदावरीचे पूजन केले आणि गंगा गोदावरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पुढे धर्मध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले. विविध धार्मिक विधी आणि गोदापूजन पार पडल्यानंतर निर्धारित मुहूर्तावर म्हणजेच दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी धर्मध्वज फडकवण्यात आला.
VIDEO | Nashik, Maharashtra: President Droupadi Murmu participates in rituals during Dhwajarohan ceremony at Shri Ramkund along the Godavari Ghats, marking the formal launch of the Simhastha Kumbh period. #Nashik #SimhasthaKumbh (Full video available on PTI Videos - https://t.co/bIyFWTeOLF)
— Press Trust of India (@PTI_News) October 31, 2026
नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींची उपस्थिती
नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहण सोहळ्याला यापूर्वी कधीही राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांसारख्या सर्वोच्च घटनात्मक पदावरील व्यक्तींनी उपस्थिती लावली नव्हती. मात्र, यंदाच्या सिंहस्थाच्या प्रारंभालाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहिल्याने नाशिकच्या धार्मिक इतिहासात एका नव्या अध्यायाची नोंद झाली आहे.
दरम्यान, 30 ऑक्टोबरपासून गोदावरीच्या तीरावर तीन दिवसांच्या विशेष यज्ञाला आणि विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. धर्मध्वजारोहणानंतर 1 नोव्हेंबर रोजी शृंगेरी पीठाचे शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्या हस्ते या यज्ञाची पूर्णाहुती होणार आहे.
#WATCH Trimbakeshwar, Maharashtra: President Droupadi Murmu participated in the flag-hoisting ceremony at Kushavarta Tirtha on the occasion of the commencement of the Simhastha Kumbh. https://t.co/fwSpGUvPPw
— ANI (@ANI) October 31, 2026
प्रभू श्रीरामांच्या वनवासाशीही नाशिक सिंहस्थाचा ऐतिहासिक संदर्भ
नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचा इतिहास प्राचीन काळापासून असल्याचे विविध ऐतिहासिक नोंदींमधून समोर येते. प्रभू श्रीरामचंद्र चित्रकूट येथून वनवासाच्या प्रवासात नाशिक क्षेत्रात आले, त्यावेळीही येथे कुंभमेळा सुरू असल्याचा उल्लेख आढळतो. तसेच सीताहरणानंतर प्रभू श्रीरामांनी नाशिकमधून प्रस्थान केले, त्यावेळीदेखील सिंहस्थ सुरू होता, अशी नोंद सांगितली जाते.
सिंहस्थाच्या प्राचीन परंपरेचे संदर्भ सातवाहन राजवटीतही आढळतात. इसवी सन 73 मध्ये सातवाहन राजाच्या काळात सिंहस्थ झाल्याची नोंद पांडव लेणी येथे असल्याचे सांगितले जाते. याशिवाय देवगिरीच्या यादव राजवटीतील दुसऱ्या यादवाच्या काळात, इसवी सन 1000 मधील सिंहस्थाचा उल्लेखही ऐतिहासिक नोंदींमध्ये आढळतो.
सूर्यग्रहणाच्या पर्वावर गोदावरी, अरुणा आणि वरुणा नद्यांच्या संगमस्थानी धार्मिक सोहळा भरल्याचा संदर्भ संगमनेर ताम्रपटात नमूद असल्याचे सांगितले जाते. अरुणा नदीचा उगम इंद्रकुंडाकडून होत असून, वरुणा नदीला सध्या वाघाडी या नावाने ओळखले जाते.
यंदाचा सिंहस्थ 21 महिन्यांचा; ग्रहांच्या स्थितीमुळे विशेष योग
श्री क्षेत्र नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 31 ऑक्टोबर 2026 पासून सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी गुरू ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केल्याने सिंहस्थ पर्व सुरू झाल्याचे ज्योतिषशास्त्रीय गणित सांगते.
यंदाच्या कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी त्रिखंडी योग जुळून आला आहे. सामान्यतः गुरू ग्रह एका राशीत सुमारे 13 महिने वास्तव्य करतो. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याचा कालावधीही साधारणतः 13 महिन्यांचा असतो. मात्र, यंदा ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे सिंहस्थाचा एकूण कालावधी 21 महिन्यांचा राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची गती कधी सरळ, तर कधी वक्री असते. वक्री अवस्थेत ग्रह मागील राशीच्या दिशेने प्रवास करत असल्याचे मानले जाते. याच ग्रहस्थितीशी यंदाच्या सिंहस्थाच्या दीर्घ कालावधीचा संबंध जोडला जात आहे. 31 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झालेल्या या पर्वात दोन वेळा खंड पडणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
धर्मध्वजारोहणाच्या ऐतिहासिक सोहळ्याने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक पर्वाला सुरुवात झाली असून, पुढील 21 महिन्यांच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम आणि परंपरांचे आयोजन होणार आहे.