पावसाने महिनाभर दडी मारल्याने खरीप पिके संकटात; दिवसा वीजपुरवठ्यासह नादुरुस्त डीपी तातडीने बदलण्याची मागणी
बुलढाणा : जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी कोमेजून गेली आहेत. अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात तातडीने ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करून दुष्काळी उपाययोजना लागू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु भारत बोंद्रे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यात पावसाअभावी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यासह विविध खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. पिकांना वेळीच पाणी मिळाले नाही तर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत आणि दुष्काळी सवलती देण्याची गरज असल्याचे बोंद्रे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअरवेल किंवा धरणातील पाण्याची उपलब्धता आहे, त्यांनाही अपुऱ्या व अनियमित वीजपुरवठ्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी त्यांना अंधारात शेतात जावे लागते. यावेळी जंगली श्वापदांसह साप, विंचू आदींपासून जीवितास धोका निर्माण होत असल्याचे बोंद्रे यांनी निदर्शनास आणून दिले.
त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा पुरेसा आणि सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, तसेच नादुरुस्त झालेले डीपी तातडीने बदलण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. महावितरण विभागाची रखडलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असेही बोंद्रे यांनी म्हटले आहे.
या मागणीसंदर्भात शंतनु बोंद्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पावसाची स्थिती, खरीप पिकांचे संभाव्य नुकसान तसेच शेतकऱ्यांच्या वीज आणि पाणी समस्यांची माहिती पालकमंत्र्यांना दिली.
या प्रकरणाची पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी श्री. देवरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. शेतकरी संकटात सापडू नये आणि खरीप पिकांचे नुकसान टाळता यावे, यासाठी प्रशासनाने निवेदनातील मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिल्याचे शंतनु बोंद्रे यांनी सांगितले.
पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर असून, शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासह वीज, पाणी आणि पीक नुकसानाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.