हिंगोली (Hingoli Police) : नवीन फौजदारी कायद्यांच्या (NCL) अंमलबजावणीत हिंगोली जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशपातळीवर हिंगोली जिल्हा १९ व्या क्रमांकावर आहे. केंद्र सरकारने १ जुलै २०२४ पासून नवीन फौजदारी कायदे लागू केले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी जाहीर केलेल्या जिल्हानिहाय मानांकनात १ ऑक्टोबर २०२६ रोजी हिंगोली जिल्ह्याने ९५.१३ गुणांसह राज्यात अव्वल स्थान मिळवले. या मानांकनात राज्यातील ५० पोलीस घटकांचा समावेश होता.
हिंगोली पोलिसांना प्रशासकीय सुधारणांमध्ये १९.६७ गुण, कार्यकुशलतेमध्ये ४०.४६ गुण, तंत्रज्ञान वापरात २५ पैकी २५ आणि प्रणाली एकत्रीकरणात १० पैकी १० असे एकूण ९५.१३ गुण मिळाले आहेत.
भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) आणि भारतीय साक्ष्य अधिनियम (BSA) चा प्रभावी वापर, संगणकीय प्रथम खबर, झडती-पंचनाम्याचे चित्रीकरण आणि न्यायवैद्यक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे हे यश मिळाल्याचे सांगण्यात आले.
पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाखा व ठाण्याच्या अधिकारी-अंमलदारांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.